साखर झोपेत दोन चिमुकल्या सख्या भावांना काळानं गाठलं; अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने जागीच मृत्यू | पुढारी

साखर झोपेत दोन चिमुकल्या सख्या भावांना काळानं गाठलं; अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : रिद्धी सिद्धी जिनिंगमध्ये झोपेत असलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन लालसिंग मेवाड (वय ३), कार्तिक लालसिंग मेवाड (वय २) रा. भगवानपुरा जि. खरगोण मध्यप्रदेश या दोन चिमुकल्यांचा सरकी पेंड वाहतुक करणाऱ्या टेम्पोखाली चिरडून मृत्यु झाला आहे. ही घटना १७ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,सदर टेम्पो हा सरकी पेंड घेऊन पावसामुळे जवळच असलेल्या रिद्धी सिद्धी जिनिंगच्या शेडमध्ये उभा होता. सोमवारी सकाळी टेम्पो मागे घेत असताना जिनिंगच्या आवारात साखर झोपेत असलेल्या मजुरांच्या या दोन चिमुकल्या भावडांना टेम्पोने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर मुस्कान लालसिंग मेवाड (वय ६) ही मुलगी बाजुला पळाल्याने ती बालबांल बचावली गेली. मात्र ती किरकोळ जखम झाली आहे.

उन्हाळा असल्याने जिनिंग मध्ये काम करणारे मजुर मुलाबाळासह जिनिंग आवारात झोपले होते. पहाट होताच मजुरांनी आपले काम सुरु केले, तर ही बालके तेथेच झोपेत होती. घटनेनंतर संतप्त मजुरांनी चालकास जिनिंग कार्यालयात कोंडून ठेवले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी अपघातग्रस्त टेम्पो पोलिस ठाण्यात घेऊन जाताना मजुरांनी त्याची हवा सोडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातुन जिनिंग मजुर आणि पोलिसांत बाचाबाची झाली. नंतर पोलिसांची जास्तीची कुमक पाचारण करून बंदोबस्तात टेम्पो ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.

Back to top button