कर्जत बाजार समितीत तिरंगी लढत ! महाआघाडी, भाजप अन् तिसर्‍या आघाडीचाही पॅनेल रिंगणात | पुढारी

कर्जत बाजार समितीत तिरंगी लढत ! महाआघाडी, भाजप अन् तिसर्‍या आघाडीचाही पॅनेल रिंगणात

गणेश जेवरे

कर्जत : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये यावर्षी मोठी चुरस रंगणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन आमदार रोहित पवार एक पॅनेल तयार करणार आहेत. तर, आमदार राम शिंदे हे भाजपचा पॅनल तयार करत आहेत. याबरोबरच तिसरी आघाडी तयार करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे करणार आहेत.

बाजार समितीची निवडणूक यावेळी खूपच वेगळ्या राजकीय पद्धतीने लढविली जाणार आहे. या संस्थेच्या इतिहासातील ही सर्वात आगळीवेगळी निवडणूक असेल असे म्हणले तरी या ठिकाणी वावगे ठरणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या मतदारसंघातून आमदार रोहित पवार हे निवडून आल्यापासून कर्जत तालुक्यातील राजकीय पार्श्वभूमी बदलल्याचे पाहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणूक आमदार पवार हे तितक्याच गांभीर्याने लढवित असल्याचे पाहावयास मिळते. प्रत्येक जागेवर उमेदवार कोणता योग्य राहील, निवडून येण्याची क्षमता किती, यासह सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याची त्यांची विशेष खासियत आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये कर्जतकरांना हे सर्व पाहावयास मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार पवार हे जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याची दिसून येत आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक गटनिहाय काही विशिष्ट प्रमुख कार्यकर्त्यांची समिती तयार केलेली आहे. याच प्रमाणे त्यांची स्वतःची यंत्रणा देखील या ठिकाणी काम करत आहे. दुसरीकडे, आमदार राम शिंदे यांनीही भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सेवा संस्था, ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघांमध्ये प्रत्येक गटामधून उमेदवार उभा करण्यासाठी त्यांनी नियोजन केल्याचे दिसून येते. या निवडणुकीमध्ये भाजप आणखी कोणाला सोबत घेणार की स्वबळावर निवडणूक लढविणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आमदार शिंदे यांनी सर्व पत्ते खुले ठेवले आहेत. उमेदवारी न मिळालेल्या काही नाराज मंडळींना देखील आपलेसे करून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढविण्यावरच भाजप व आमदार शिंदे यांच्याकडून भर असल्याचे दिसून येते.

तिसरी आघाडी महत्त्वाची
जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचे सेवा संस्थांवर चांगले प्रभुत्व आहे. सेवा संस्थांमधून बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून गेल्यामुळे व विद्यमान संचालक असल्यामुळे, तसेच सेवा संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते संपर्क ठेवून असल्यामुळे या सर्व जागांवर त्यांचे प्रभुत्व असल्याची दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त संचालक सेवा संस्थेमधून निवडले जातात.

या सर्व पार्श्वभूमीवर पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये तिसरी आघाडी निवडणुकीचे रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येते. यासाठी पिसाळ यांना भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून काही नेते रसद पुरवित असल्याचे दिसून येते. ही तिसरी आघाडी जर निवडणुकीत उतरली, तर मात्र निवडणूक एका वेगळ्या पद्धतीने लढविली जाईल, असे दिसून येत आहे.

मंत्रीपद असूनही त्यांच्याकडून बाजार समितीचा कोणताही विकास झाला नाही. संस्थेच्या अन् शेतकर्‍यांच्या हितासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेऊन चांगल्या उमेदवारांचा पॅनेल तयार करू विजय मिळवू.

                                        – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी.

मित्रपक्षांना सोबत घेऊन बाजार समितीत भाजपचा झेंडा फडकविणार. त्या दृष्टीने सर्व तयारी पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते करत आहेत. माझ्याकडे सध्या कर्नाटक राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

                                     – प्रा.राम शिंदे, आमदार, भाजप.

बाजार समिती निवडणुकीत तिसरी आघाडी तयार करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. तिसरी आघाडी तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत.

                            – अंबादास पिसाळ, संचालक, जिल्हा बँक.

Back to top button