कोळगाव; पुढारी वृत्तसेवा : घोटवी (ता. श्रीगोंदा) येथे काल सायंकाळी वादळी वार्यासह गारांचा एक तास पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांचे द्राक्ष, कांदा, गहू यासह शेतीचे मोठे नुकसान झाले. आमदार बबनराव पाचपुते, माजी सभापती पुरुषोत्तम लगड व अधिकार्यांनी प्रत्यक्ष द्राक्ष बागेत जाऊन पंचनामा केला.
काल संध्याकाळी अचानक आकाशामध्ये ढग आले आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. काही क्षणात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या गाराही पडू लागल्या. त्यामुळे घोटवी परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घोटवी येथील सुरेश भाऊसाहेब निंभोरे यांच्या बागेचे गारपिटीने मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे नुकसान झाले.
या नुकसानीचा पंचनामा व प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, नायब तहसीलदार नीलेश वाघमारे, कामगार तलाठी होळकर, मार्केट कमिटीचे संचालक लक्ष्मण नलगे, बाळासाहेब बारगुजे, घोटवी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बापू लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कदम, नारायण निंभोरे, बाळासाहेब बबन बारगुजे, विनोद निंभोरे व घोटवीतील ग्रामस्थ उपस्थित होते. घोटी गावाबरोबर श्रीगोंदा तालुक्यात पारगाव, आढळगाव, सुरोडी, वडाळी येथेही गारा पडले.