नगर : बिग बजेट शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत सोनेरी झुंज ! | पुढारी

नगर : बिग बजेट शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत सोनेरी झुंज !

नगर; पुढारी वृत्तसेवा : कुस्ती इतिहासातील बिग बजेट निमंत्रीत राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 23 एप्रिल दरम्यान रंगणार असून, यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे शहरातील वाडियापार्क मैदानावर आयोजिली आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (अंदाजे किंमत 35 लाख) स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी रविवारी (दि.16) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, युवा नेते सुवेंद्र गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, सचिन जाधव, महेश लोंढे, नगरसेवक प्रदीप परदेशी, प्रशांत मुथा, भाजपचे संघटनमंत्री अ‍ॅड. विवेक नाईक, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, तालीम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, आनंद शेळके, युवा मोर्चाचे आशिष आनेचा, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी सदस्य रवि लालबोंद्रे, संजय छजलाणी, आकाश कातोरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत ‘महारष्ट्र केसरी’च्या धरतीवर लाल माती व व मॅटवर कुस्त्या रंगणार आहेत. एक मातीचा आखाडा व दोन गादीचा आखाडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या स्पर्धेत राज्यातील दिग्गज मल्लांची कुस्ती पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, स्पर्धेतील विजेत्या मल्लास कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अर्धा किलो सोन्याची गदा मिळणार आहे. द्वितीय विजेत्यास दोन लाख व तृतीय विजेत्यास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

गुरुवारी (दि.20) सकाळी स्पर्धेत प्रवेश व वजन यानंतर गट पाडणे, स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.21) सायंकाळी पाच वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे असून, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, अर्जुनवीर पुरस्कार वीजेते पै. काका पवार, महाराष्ट्र केसरी पै. गुलाबराव बर्डे, पै. अशोक शिर्के, पै. संदीप भोंडवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेची अंतिम लढत रविवारी (दि.23) होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या मल्लास सोन्याची गदा देण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे अध्यक्षतेखाली होणार्‍या या स्पर्धेस सहकार मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे सचिव संजय मोरे आदींसह दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तब्बल दहा महाराष्ट्र केसरी उतरणार
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल दहा महाराष्ट्र केसरी उतरणार आहेत. यामध्ये खास आकर्षण असलेले पै. सिकंदर शेख, पै. माऊली कोकाटे, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पै. पृथ्वीराज पाटील, पै. हर्षवर्धन सदगीर, पै. महेंद्र गायकवाड, पै. बाला रफिक शेख आदी नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.

अशी रंगणार शिवराय केसरी स्पर्धा
शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा माती व गादी विभागात 48, 57, 61, 65, 70, 74, 79 व 86 किलो वजन गटात होणार. तर अंतिम छत्रपती शिवराय केसरी ओपन गट सोन्याच्या गदेसाठी 86 ते 135 किलो वजनगटात रंगणार आहे. विविध वजन गटातून विजयी मल्लांमधून अंतिम कुस्ती लाल मातीच्या आखाड्यात होईल. 48, 57, 61, 65, 70, 74 वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे एक लाख, 50 हजार, 30 हजार रुपये, तसेच 79, 86 किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकास अनुक्रमे एक लाख 25 हजार, 75 हजार व 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी डिजिटल गुणफलकाची व्यवस्था असणार आहे.

Back to top button