

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यभरात आरोग्य विभागकडून 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम राबविण्यात येत असून, कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची तीन कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत; मात्र गेल्या वर्षभरापासून वापराविना उभी आहे. तर, येथील कुकाणा आरोग्य केंद्र पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात चालू असून, तिथे रुग्णांसह आरोग्य कर्मचार्यांनाही असुविधांचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधण्यासाठी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्र मुळा पाटबंधारे वसाहतीत एका पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात हलविण्यात आले. तर, एक वर्षात देखणी व सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत उभी राहिली. कामांच्या बाबतीत सर्व समाधानी असताना हे आरोग्य केंद्र नवीन इमारतीतकेव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा लागली आहे. वर्ष लोटले; मात्र आरोग्य केंद्र काय नवीन इमारतीत जाऊ शकले नाही.
या नव्या आरोग्य केंद्रात आंतररुग्ण, बाह्यरुग्ण विभाग, औषधोपचार कक्ष, भंडारग्रहासह सर्व आद्ययवत सुविधा, आरोग्य खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु, केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कुकाणा केंद्रात सात उपकेंद्र असून, 57 हजार लोकसंख्या या केंद्रांतर्गत येते. कुकाण्यासह भेंडा बुद्रूक, भेंडा खुर्द, तरवडी, चिलेखनवाडी, देवगाव, देडगाव, तेलकुडगाव उपकेंद्रासह 18 गावे या केंद्रात येतात.
दोन वैद्यकीय अधिकार्यांसह 24 जण, असे कर्मचारी आहेत. अधिकारी, कर्मचारी, कामाचा अभियंता यांच्या कामावरही जनता समाधानी. अडचण आहे, ती नव्या इमारतीत आरोग्य केंद्र केव्हा सुरू होणार याची. कुकाणा सरपंच लता अभंग, चिलेखनवाडी सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत, वडूले सरपंच दिनकर गर्जे, अंतरवाली सरपंच संदीप देशमुख, भेंडा सरपंच वर्षा नवले, सौंदाळा सरपंच प्रियंका आरगडे, देवगाव सरपंच सुनीता गायकवाड, तरवडीचे बाबासाहेब घुले आदींनी केंद्र नव्या इमारतीत सुरू करण्याची मागणी केली.
'सुंदर माझा दवाखाना' उपक्रम
7 ते 14 एप्रिल दरम्यान आरोग्य विभागाकडून 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम राबविला असून, राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर रोख बक्षीस व सन्मान चिन्ह प्रथम आलेल्या आरोग्य केंद्राना दिले जाणार आहेत.
इमारतीचे काम पूर्ण झालेले असले तरी आवारातील गेट, स्ट्रीट लाईट ही काही कामे राहिलेली आहेत. त्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. एक सुपर वायझर व आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहेत.
– दीपक डंबीर,
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, कुकाणा