खेड; पुढारी वृत्तसेवा : नागरिक व शेतकर्यांची कामे सहज व्हावीत या उद्देशाने शासनाने नव्याने अत्याधुनिक तलाठी कार्यालयाची इमारत मंजूर केली आहे. तालुक्यातील अनेक मोठ्या महसुली गावांत मंजूर तलाठी कार्यालये बांधकाम होऊन अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र, खेड (ता.कर्जत) येथील तलाठी कार्यालयाच्या कामाला भूमिपूजन होऊन वर्ष लोटले, तरी कामाला मुहूर्त लागला नसल्याने महसूल विभाग नेमके करतेय काय?, असा सवाल नागरिक करत आहेत.
जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत, महसूल व वनविभाग इमारत योजनेतून नवीन तलाठी कार्यालयाची अंदाजे 33 लाख 92 हजार रकमेची इमारत खेडसाठी मंजूर झाली. या कामाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी झाले. त्यानंतर ठेकेदाराकडून भूमिपूजन झालेल्या जागेची पाहणी करून मोजणी करण्यात आली;
मात्र या अपुर्या जागेवर इमारत बसत नसल्याचे सांगत ठेकेदाराने या कामाकडे पाठ फिरवली. ग्रामस्थांनी तहसीलदार, आमदार रोहित पवार यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तत्कालीन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नवदीप क्रीडांगणाची मोकळी जागा निश्चित केली; मात्र ही जागा क्रीडांगणाची असल्याने ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. वास्तविक या कार्यालयासाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध असतानाही महसूल विभागाला ही इमारत उभी करण्यासाठी कसलाही रस नसल्याचे यातून दिसून येते. जागा बदलीबाबत उदासीन असलेल्या महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे या इमारतीसाठी उपलब्ध निधी माघारी जाण्याची वेळ येऊ नये, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.