उन्हाच्या तीव्रतेने पाथर्डीत शुकशुकाट; उष्माघाताचा धोका वाढला | पुढारी

उन्हाच्या तीव्रतेने पाथर्डीत शुकशुकाट; उष्माघाताचा धोका वाढला

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने खबरदारी म्हणून नागरिकांनी रस्त्यावर येणे टाळले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून 37 ते 39 अंश सेल्शिअस इतके तापमान नोंदविले गेले आहे.

उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे लोकांनी काम असेल तरच घराच्या बाहेर पडणे पसंत केले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहे. भर उन्हात उघड्यावर काम करणारे हमाल, गवंडी, मोलमजुरी करणारे, हातगाड्यावर व रस्त्यावर बसून छोटे व्यवसाय करणारे यांच्यावरही उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम झाला आहे. शेतीच्या कामांवरही उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम जाणवत आहे. तरीही शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत.

पाथर्डी शहरातील बाजारपेठेत उन्हामुळे दुपारच्या वेळी दुकानात ग्राहक दिसत नाही. उन्हापासून बचाव होण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर हिरव्या कापडाचा उपयोग करून अच्छादन बांधले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उसाचा रस, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स, लिंबू शरबत, ज्यूस अशा शीतपेयांची मागणी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.

उन्हापासून असा करा बचाव

तापमान खूप वाढल्याने शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होतो. त्यामुळे या दिवसांत पाणी जादा प्यावे. घराच्या बाहेर पडताना सैल कपडे घालावेत. डोक्यावर अच्छादन म्हणून टोपी अथवा कपडा असावा. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे डॉ.अभय भंडारी यांनी सांगितले.

Back to top button