वाळकी : कांदा अनुदान जाचक अट; शेतकरी रस्त्यावर | पुढारी

वाळकी : कांदा अनुदान जाचक अट; शेतकरी रस्त्यावर

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : कांदा अनुदान प्रस्तावातील जाचक अट रद्द करण्यासाठी नगरमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी नगर बाजार समिती गेटसमोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलक व पोलिसांत काही काळ झटापटही झाली. शेवटी शेतकर्‍यांच्या अर्जावर पोहोच देण्याच्या आणि या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याच्या प्रशासकांच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबले.

राज्य सरकारने कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी शनिवारी अनेक शेतकरी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अर्ज भरण्यासाठी आले होते. बर्‍याच शेतकर्‍यांकडेे ऑनलाईन उतार्‍यावर कांद्याची नोंद नव्हती. काहींनी तलाठ्याने हाताने नोंद केलेले उतारे आणले होते. तसेच खरीप, रब्बी अशी वर्गवारी असावी, असे बाजार समितीचे कर्मचारी त्यांना सांगत होते. या बाबींची पूर्तता नसल्याने शेतकर्‍यांचे अर्ज स्वीकारण्यास नकार देत होते. शेतकर्‍यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांना बोलावून घेतले.

त्यांनी या जाचक अटी रद्द करून शेतकर्‍यांचे अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी केली. परंतु शासन निर्णयानुसार अर्ज घेता येणार नाहीत, असे सचिव व प्रशासकाने सांगितले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समिती कार्यालय बंद करीत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ही माहिती मिळताच मोठा पोलिस फौज फाटा तेथे दाखल झाला. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे हेही आले, त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

मात्र, कार्ले व शेतकरी मागणीवर ठाम राहिले. उपअधीक्षक कातकडे यांनी प्रशासक, सचिवांना आंदोलनस्थळी बोलावले. तेथे त्यांनी सर्वांचे अर्ज घेण्याचे मान्य केले. परंतु शिक्क्यासह पोहोच देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांत झटापट झाली. शेतकर्‍यांचे अर्ज घेऊन त्यावर शिक्के देण्याचे व शासनाशी पत्रव्यवहार करण्याचेआश्वासन प्रशासक व सचिवांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

Back to top button