नगर; पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब व निराधार जनतेची उपासमार होऊ नये, यासाठी शिवभोजन केंद्र सुरू आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शिवभोजन केंद्रचालकांची बिलेच अदा झाली नाहीत. त्यामुळे शिवभोजन चालकांचीच उपासमार सुरू झाली. किराणा दुकादारांची उसणवारी वाढली असल्यामुळे किराणा साहित्य देण्यास टाळाटाळ करू लागले. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, काही चालकांनी शिवभोजन केंद्र चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
राज्यभरातील गोरगरीब व निराधार जनतेला पोटभर अन्न मिळावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्र सुरू केले. प्रारंभी अहमदनगर शहरात सात ते आठ केंद्र सुरू होते. आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी काही केंद्र सुरू करण्यास शासनाला भाग पाडले. त्यामुळे नगरमध्ये ही संख्या आता 17 झाली.
ग्रामीण भागात तालुक्यांच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरू झाले. जिल्हाभरात एकूण 34 शिवभोजन केंद्र सुरू आहेत.या केंद्रांच्या माध्यमातून दररोज 4 हजार 240 गोरगरीब व निराधार जनतेला एक वेळचे पोटभर अन्न दिले जात आहे. या योजनेला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राज्य शासनाकडून शिवभोजन केंद्रचालकांना एका थाळीपाठीमागे 40 रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय 10 रुपये लाभार्थ्यांकडून उपलब्ध होतात. एकंदरीत शहरातील चालकांना थाळीमागे 50 रुपये तर ग्रामीण भागातील चालकांना 35 रुपये अनुदान मिळते. मात्र, नगर शहरातील चालकांची नोव्हेंबरपासून तर ग्रामीण भागातील चालकांची सप्टेंबरपासून बिले प्रलंबित आहेत.
बहुतांश लाभार्थी 10 रुपये देखील देत नाहीत. त्यामुळे केंद्रचालकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून, शिवभोजन केंद्र कसे चालवावे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. बिले वेळेवर मिळत नसल्याने श्रीरामपूर व व इतर काही चालकांनी शिवभोजन केंद्र चालविण्यास असमर्थता दर्शवली आहे.