केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे | पुढारी

केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली सरकारच्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करीत आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपल्यासोबत असलेल्या सहकार्‍यांना त्या वेळी आपण शुद्ध आचरण ठेवण्याचा सल्ला देत होतो. तरीही पुढे त्यांनी मार्ग बदलला. आता त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

दिल्ली सरकारने मद्यविक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये मनीष सिसोदिया यांना आधीच अटक झाली आहे. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलाविले आहे.
केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना हजारे यांच्या आंदोलनातून झाली आहे. त्यावेळी केजरीवाल हे हजारे यांचे शिष्य मानले जात होते.

या कारवाईबाबत बोलताना हजारे म्हणाले, आमच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला. त्यांनी राजकाराणात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र आमचा तो मार्ग नसल्याचे सांगितले. त्यावेळी मी या लोकांना शुद्ध आचारणाचा सल्ला दिला. मला दु:ख होत आहे की, सिसोदियासारखा नेता तुरूंगात आहे. तुरूंगात जावे, पण समाज आणि देशाच्या भल्यासाठी. स्वत:च्या भल्यासाठी नाही, असे मी मानतो, असेही हजारे म्हणाले.

केजरीवाल यांच्या चौकशीबाबत हजारे म्हणाले, मी पूर्वीच केजरीवाल यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होती की, हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही हजारे यांनी दिला आहे.

Back to top button