नगर : पावणेतीन हजार शेतकर्‍यांना फटका | पुढारी

नगर : पावणेतीन हजार शेतकर्‍यांना फटका

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी (दि. 14 व 15) या दोन दिवसांत झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने 35 गावांतील एक हजार 795.62 हेक्टर क्षेत्रावरील पिके व फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याचा आर्थिक फटका दोन हजार 834 शेतकर्‍यांना बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

जिल्ह्यात दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. दर आठवड्याला कोठेना कोठे अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. शुक्रवारी जामखेड व कोपरगाव या दोन तालुक्यांतील 5 गावांना अवकाळीने फटका दिल्याने तेथील 23 शेतकर्‍यांच्या 10.80 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात जामखेडमधील 4 गावांतील 10 हेक्टरचा समावेश आहे.

शनिवारी देखील पारनेर, श्रीगोंदा, अकोलेे, संगमनेर व जामखेड या पाच तालुक्यांतील 30 गावांमधील एक हजार 785 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा बसला. त्यामुळे दोन हजार 811 शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. अकोले तालुक्यातील सात गावांतील एक हजार 102 हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली असून, त्यामुळे एक हजार 432 शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. श्रीगोंदा तालुक्यातदेखील 322 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

तालुकानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अकोले 1102, श्रीगोंदा 322, पारनेर 285, जामखेड 26.90, संगमनेर 60, कोपरगाव 0.80.

Back to top button