कोल्हार भगवतीपूरमध्ये घरफोडी; तीन लाख रुपये लंपास | पुढारी

कोल्हार भगवतीपूरमध्ये घरफोडी; तीन लाख रुपये लंपास

कोल्हार; पुढारी वृत्तसेवा : भगवतीपुरमध्ये इंदिरा चौकातील होलसेल मालाचे विक्रेते प्रसाद एजन्सीचे संचालक संजय शामलाल असावा यांच्या प्रसाद निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारला. घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल 3 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने कोल्हारमध्ये खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या तिसर्‍या मजल्यावरील टेरेसच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करीत संजय असावा यांच्या बेडरूममधील 3 लाखाची रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, सकाळी आसवा यांच्या पत्नी नीता असावा टेरेसवर गेल्या असता त्यांना खिडकीचे गज तोडलेल्या अवस्थेत तर टेरेसवरील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पती संजय असावा यांना ही घटना सांगितली. असावा यांनी टेरेसवर येऊन पाहणी केली. बँकेची पुस्तके व पावत्या टेरेसच्या खोलीमध्ये दिसल्या.

3 लाख रुपये चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा दर्शनी भाग वरच्या बाजूस सरकविल्याने सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे फक्त चित्रण झाले आहे. कॅमेर्‍याचे तोंड वर करताना चोरट्याचे डोळे कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. चोरट्याने तोंड पुर्णतः बांधून घरात प्रवेश केला. त्याच्या हातात लाकडी दांडा होता.

या प्रकरणी संजय असावा यांनी लोणी पोलिस स्टेशनमध्ये चोरीची फिर्याद दाखल केली. घटनास्थळी लोणीचे सपोनि योगेश शिंदे, कोल्हार आऊट पोस्टचे बाबासाहेब लबडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
कोल्हार आऊट पोस्टचे बाबासाहेब लबडे व संभाजीकुसळकर अधिक तपास करीत आहे.

दरम्यान, संजय असावा यांच्या घरी नऊ महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा तपास अद्याप लागला नसताना पुन्हा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे असावा परिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी बँकेला सुट्टी असल्यामुळे असावा यांनी विक्री केलेल्या मालाची रोकड रक्कम घरीच ठेवली होती. काल (शनिवारी) 3 लाख रुपये ते बँकेत जमा करणार होते. तत्पूर्वीच चोरट्यांनी ही रक्कम चोरून पोबारा केला. घराची माहिती असलेल्या चोरट्याने 3 लाख रुपयांवर डल्ला मारला असावा, अशी चर्चा कोल्हार येथील नागरिकांमध्ये झडत आहे.

  • घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचरण केल्याने चोरीचा तपास सुलभ होण्याची चिन्हे आहेत.

Back to top button