दुर्दैवी घटना : चरात पडून चिमुरडीचा मृत्यू; गावावर शोककळा | पुढारी

दुर्दैवी घटना : चरात पडून चिमुरडीचा मृत्यू; गावावर शोककळा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : जल जीवन मिशन अंतर्गत तळेगावसह 21 गावांच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनसाठी खोदलेल्या चराच्या पाण्यात 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यातील निळवंडे येथे हळ-हळ व्यक्त होत आहे. मधुबाला श्याम साळुंखे असे मृत बालिकेचे नाव आहे. निळवंडे येथे जल जीवन मिशन अंतर्गत प्रवरा नदीवरून तळेगावसह 21 गावांना पाणी पुरवठा करणार्‍या योजनेचे काम सुरू आहे.

यासाठी निळवंडे गावात कोल्हापूर येथील ठेकेदार कंपनीने दोन महिन्यांपासून नवीन पाईप लाईनचा चर खोदला आहे. या चराजवळ जुनी पाईप लाईन फुटल्याने चर पुर्णतः पाण्याने भरला आहे. चराच्या पाण्यात शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जि. प. शाळेजवळील मधुबाला साळुंखे ही चिमुकली खेळत होती.

अचानक चरात पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मधुबाला हिला तत्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी ती मृत पावल्याचे जाहीर केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तालुका पोलिसात दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

ठेकेदारावर कारवाई करा; उपसरपंचांची मागणी
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशनद्वारे नवी पाईप लाईन टाकण्यात येत आहे. जुनी पाईप लाईन फुटल्याने चरात पाणी साठले. ते न काढल्यामुळे गावातील मधुबाला या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराचा हलर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे उघड झाले आहे. या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच भाऊसाहेब पवार यांनी केली आहे.

Back to top button