नेवाशात वाळू उपसा डेपोचा वाद पेटला | पुढारी

नेवाशात वाळू उपसा डेपोचा वाद पेटला

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या वाळू डेपोला नेवासा तालुक्यातील अंमळनेर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येथील वाळू उपशाचा निर्णय रद्द न झाल्यास तहसील कार्यालयासमोर जनावरे व मुलाबाळांसह बेमुदत उपोषण करण्यासचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
राज्य शासनाने वाळू तस्करी रोखण्यासाठी, तसेच शासनाच्या महसूल वाढीसाठी वाळू लिलाव पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, शासनामार्फत वाळू डेपोची निर्मिती करून सर्वसामान्यांना साडेसहाशे रूपये ब्रासप्रमाणे वाळू देण्याचे नवीन धोरण अवलंबिले आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नेवासा तालुक्यातील अंमळनेर शिवारात मुळा नदीत विविध अधिकार्‍यांमार्फत स्थळ निरीक्षण करून वाळू डेपो निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु, या वाळू डेपोला अंमळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. नेवासा तालुक्यात इतरत्र वाळू साठे असताना केवळ अंमळनेर शिवारातील वाळू उचलण्याचा घाट सरकारी अधिकार्‍यांनी घातला आहे. या भागातील वाळू उपशामुळे आमच्या भागातील पाणी पातळी खोलवर जाऊन या परिसरात भयंकर दुष्काळ उद्भवण्याची परिस्थिती नाकारता येत नाही.

त्यामुळे या भागातील शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू डेपोला आमचा पूर्णपणे विरोध असून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने यास विरोध करणार आहोत. वाळू डेपो निर्णय रद्द न केल्यास जनावरे व मुलाबाळांसह नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा, तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

सरपंच ज्ञानेश्वर माऊली ऐनर, सोपान सुपनर, अण्णासाहेब माकोणे, शिवाजी घावटे, शिवाजी आयनर, लक्ष्मण बोरूडे, चंद्रकांत माकोणे, एकनाथ पवार, गोरक्षनाथ सुपनर, खंडू कोळेकर, कर्णा साहेब, आनंद गावटे, नवनाथ डोईफोडे, अशोक मोरे, नानासाहेब बर्डे, माऊली पवार, हरिभाऊ बोरुडे, माऊली माकोणे, दत्तात्रय बाचकर आदींच्या सह्या आहेत.

ग्रामसभेच्या निर्णयानुसार प्रस्ताव
अंमळनेर येथील वाळू डेपो उपशाबाबत सरकारी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्या सभेत काही लोकांनी सहमती दर्शविली होती. त्यामुळे तेथे वाळू डेपो निर्मितीचा निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविल्याचे तहसीलदार संजय बिरादर यांनी सांगितले.

95 टक्के लोकांचा वाळू डेपोस विरोध
अंमळनेर येथे अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत केवळ पाच टक्के लोकांनी वाळू उपसा ठरावावर सह्या केल्या. त्यानंतर पुन्हा बोलावलेल्या ग्रामसभेत 99 टक्के लोकांनी वाळू डेपो निर्मितीस विरोध केला. तसा ठराव तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पाठविल्याचे सरपंच ज्ञानेश्वर ऐनर यांनी सांगितले.

Back to top button