

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : भारत देश संविधानापासून कधीही दूर गेला नाही. लोकशाहीची मूल्येही देशाने कधी सोडली नाही. जगामध्ये विश्वगुरू बनण्याची क्षमता या देशात बळकट लोकशाहीमुळेच निर्माण झाली, परंतु स्वत:चे अस्तित्व धोक्यात आले असे वाटते, त्या लोकांनाच लोकशाही धोक्यात आल्याचा भास होत असल्याचे खोचक टीकास्त्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सोडले.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्मारकाचे लोकार्पण व विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, सरपंच ओमेश जपे, हिराबाई कातोरे, नंदाताई कातोरे, अॅड. रोहिणी निघुते, रुपाली आगलावे, बाळासाहेब जपे, साहेबराव जपे आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, संविधान हाच देशाचा आत्मा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना संविधानाच्या आधारे या देशाची वाटचाल यशस्वीपणे सुरू राहिल्यामुळेच लोकशाही टिकली. समान न्यायाच्या तत्वाने अनेक आव्हानांना सामोरे जात या देशाने लोकशाहीची मूल्य टिकवून ठेवली. यासाठी डॉ. आंबेडकर यांचे विचारचं प्रेरणादायी ठरल्याने पंचायतराज व्यवस्था बळकट झाली. यातूनच प्रत्येक नागरिकाला निर्णय प्रक्रियेत अधिकार मिळाल्यामुळेच प्रत्येक नागरिकांचे हक्क अबाधित राहिले. देशाची ही विकासात्मक वाटचाल जगामध्ये आज नौवलौकीक साधत आहे, असे सांगत जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता या देशामध्ये निर्माण झाली असल्याचे मंत्री विखे म्हणाले.
सावळीविहीर भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहिलो. निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रत्येक गावाच्या विकासाचे वेगळेपण समोर आले. सावळीविहीर गावासाठी आता मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दळण-वळणाची साधने जवळ आल्यामुळे मंत्री विखे यांनी युवकांनी स्वंयरोजगारावर भर देण्याचे आवाहन केले. नागपूर समृद्धी महामार्ग, विमान तळावर सुरू होणारे नाईट लॅन्डिंगमुळे या भागात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. यासाठी युवकांनी शेती क्षेत्रात क्लस्टर तसेच कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सावळीविहीरमध्ये नव्याने बांधण्यात येणारे पशु वैद्यकीय महाविद्यालय व भविष्यात शेती महामंडळाच्या जमिनींवर आयटी पार्क उभारण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया ही या भागाच्या विकासाला नवी दिशा देणार असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले.
या भागातील शेतकरी बांधवांना कोणत्याही कराची आकारणी न करता वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या आहेत. यापूर्वी खंडकरी शेतकर्यांच्या जमीन व्यवहारांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीचे आदेश आपण दिल्याचे मंत्री विखे यांनी ठणकावून सांगितले.
आदित्यने मोठ्यांचा आदर करायला शिकावे..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले, आदित्यने मोठ्यांचा आदर करायला शिकले पाहिजे. त्यांचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यानंतर त्यांना शहाणपण येईल असं वाटत होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रडणारे नसून लढणारे नेते आहेत. सत्ता गेल्याचे एवढे वैफल्य आदित्य यांना झाले आहे की, त्यांना स्वत:लाच रडू आवरता येत नसल्याचे दिसते, अशी खोचक टीका मंत्री विखे पा. यांनी यावेळी बोलताना केली.