पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सावळीविहीरची 75 एकर जागा ; राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सावळीविहीरची 75 एकर जागा ; राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
Published on
Updated on

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणार्‍या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सावळविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची 75 एकर जागा देण्यास आज मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात याबाबत बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विज्ञान केंद्राची जागा देण्यास मान्यता दिली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्धविकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टू आदी उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील यांनी या वेळी सांगितले, की विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची घोषणा केली होती. त्यानुसार अहमदनगर येथे हे महाविद्यालय होत आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सुस्पष्ट आराखडा तयार करावा. महाविद्यालयासह परिसरात विविध विभाग, शेत आणि चारा उत्पादन क्षेत्र चालविण्यासाठी जागेची आवश्यकता असून यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या 125 एकरपैकी 75 एकर जागा निश्चित करण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रक्रिया संबंधितांनी त्वरित मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयातील विविध विभाग
पशुविज्ञान केंद्र, पदविका महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करावा. महाविद्यालय परिसरात पशुवैद्यकीय चिकित्सालय संकुल, सुसज्ज बाह्य आणि आंतररुग्ण विभाग आणि ग्राहकांसाठी निवास सुविधा असतील. वैद्यकीय, शस्त्रक्रिया, निदान, रुग्णवाहक चिकित्सालयीन विभाग असतील. पशुधन प्रक्षेत्र संकुलमध्ये पशुधन, विविध प्रजातीचे प्राणी, चिकित्सा शिकविण्यासाठी उत्पादन न करणार्‍या प्राण्यांचे एकक, चारा आणि चारा उत्पादन क्षेत्र यांच्या देखभालीसाठी पशुधन युनिट आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news