नगर : बगाडगाडा मिरवणुकीने मळगंगा यात्रा सुरू | पुढारी

नगर : बगाडगाडा मिरवणुकीने मळगंगा यात्रा सुरू

निघोज : पुढारी वृत्तसेवा : येथील मळगंगा देवीचा मुख्य यात्रोत्सव गुरुवारपासून (दि. 13) मोठ्या उत्साहात सुरू झाला. सायंकाळी पाच वाजता बगाडगाड्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने भाविक जल्लोषात सहभागी झाले होते. यात्रेच्या निमित्ताने पहाटे पुजारी सुनील गायखे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी दुणगुले बंधू यांनी महाआरती गायली. महिलांच्या हस्ते महाआरती झाली. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पुणे व नगर जिल्ह्यातील मळगंगा देवीचे स्थान असलेल्या गावांतील भाविक काठ्या व पालख्या घेऊन निघोजच्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले आहेत.

मळगंगा देवीची बगाडगाडा मिरवणूक हा मान लंके मंडळाला आहे. या बगाडगाड्यात बसून महिला भाविकांनी देवीचा नवस पूर्ण केला. जय मल्हार मंडळाचे मार्गदर्शक बाबाजी अण्णा लंके हे या बगाडगाड्याचे सारथ्य करीत असून जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव लंके, सचिव सचिन लंके व त्यांचे सहकारी म्हणजे या मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्य नियोजन करीत ही मिरवणूक लक्षवेधी करण्यासाठी अथक परिश्रम घेतात.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक साडेसहा वाजता देवीच्या हेमाडपंती बारवेजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी अंबिल वर्तविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर एसटी बसस्थानक परिसराजवळ असणार्‍या मळगंगा चित्रमंदिर परिसरात लोकसहभागातून महाप्रसाद देण्यात आला. या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ, तसेच मुंबईकर मंडळ यांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.

Back to top button