नगरमधील वंचित गावांतील नुकसानीचेही पंचनामे | पुढारी

नगरमधील वंचित गावांतील नुकसानीचेही पंचनामे

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे महसूल प्रशासनाने पंचनामे केले. परंतु, काही गावांतील पिकांचे पंचनामे झाले नव्हते. याबाबत माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या प्रयत्नांतून या गावांमधील शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मागील आठवड्यात शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. ढोरजळगाव शे, गरडवाडी आपेगाव, मलकापूर, आव्हाणे या गावांमध्ये वादळ व अवकाळी पावसाने कांदा, गहू, बाजरी व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, पंचनाम्यासाठी प्रशासनाने काढलेल्या आदेशामध्ये वरील गावांचा समावेश नसल्याने माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये माजी आमदार घुले यांनी तहसीलदार छगन वाघ यांना वरील गावांमधील नुकसानीची कल्पना देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.

भातकुडगाव फाटा येथे झालेल्या आंदोलनात माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी या गावांचा पंचनाम्यासाठी समावेश केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाने त्यांची मागणी मान्य करत प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव यांनी या गावांचा समावेश करण्याचे लेखी आश्वासन दिले. तलाठी सोनल गोलवड, ग्रामसेवक ज्ञानदेव वीर, कृषी सहायक रवींद्र ढाकणे यांनी पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली.

Back to top button