कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; शेवगावात रंगणार दुरंगी लढत | पुढारी

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; शेवगावात रंगणार दुरंगी लढत

रमेश चौधरी : 

शेवगाव : जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी भाजपने कंबर कसली आहे. इतर लहानमोठ्या राजकीय पक्षांनीही आपापली ताकद आजमावण्यासाठी निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. मात्र, खरी लढत ही दुरंगीच होण्याची शक्यता आहे. बाजार समितीत वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसकडे इच्छुकांची वर्दळ आहे. तर, भाजपाने दुसर्‍या फळीतील तगडे उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला आहे. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काही अपवाद वगळता राष्ट्रवादीकडून नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

शेतकर्‍यांच्या मालकीची असणारी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेपासून घुलेंच्या अधिपत्याखाली आहे. सुरुवातीला स्व.मारुतराव घुले व नंतर माजी आमदारद्वयी नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी एकहाती वर्चस्व ठेवले आहे. आगामी काळात होणार्‍या विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे राष्ट्रवादी व भाजपने गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जातून फायद्या-तोट्याच्या हिशेबाने गाव, गट, जात, पक्ष यांच्या अनुषंगाने खलबते सुरू झाली आहेत. तालुक्यात महाविकास आघाडीचे फारसे अस्तित्व नसले तरी काँग्रेस, ठाकरे गट, कम्युनिस्ट हे राष्ट्रवादीच्या वळचणीला जातील. तर, जनशक्ती, वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्याप जाहीर नाही. मात्र, विरोधी भाजप, शिवसेना यांच्या बरोबरच जनशक्ती मंच सत्ताधार्‍यांच्या विरोधात विरोधकात एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ.क्षितिज घुले हे सध्या अर्ज दाखल केलेल्या व इतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. तर, विरोधी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

तालुक्यातील सेवा संस्थांच्या तुलनेत ग्रामपंचायतींमध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे लढत तुल्यबळ व चुरशीची होणार याबद्दल शंका नाही. मात्र, दिलेले उमेदवार, इतर लहानमोठ्या पक्षांची भूमिका यावर सत्तेची गणिते अवलंबून असणार आहेत.
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याने आता माजी आमदार चंद्रशेखर घुले पुन्हा राजकारणात खर्‍या अर्थाने सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून मतदारसंघात त्यांच्या संपर्काअभावी कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यांनी नुकताच शेवगाव येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना उभारी दिली. मात्र, मेळाव्यात घुलेंच्या काही वेगळ्या निर्णयाच्या अपेक्षेने व उत्सुकतेने आलेल्यांचा हिरमोड झाला. या मेळाव्यात फक्त लोकप्रतिनिधींवर केलेल्या टिकेने जिल्हा बँकेत पराभव करणारे कोण आणि टिका कोणावर यावर, बरीच चर्चा रंगली होती. दोन्ही प्रमुख पक्षांच्या झालेल्या मेळाव्याने तालुक्यात राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीनंतरच खरी रणधुमाळी सुरू होणार आहे.

विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
सत्ताधार्‍यांविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जनशक्ती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांचा प्रयत्न आहे. या बाबत काहींशी त्यांची चर्चा चालू असून, सर्व विरोधकांची एकत्र येण्याची मानसिकता होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे अर्ज माघारीवेळी समजणार आहे.

Back to top button