जेव्हा ओढाच भूमिगत होतो… | पुढारी

जेव्हा ओढाच भूमिगत होतो...

सूर्यकांत वरकड :

 नगर : सावेडी उपनगरातील नय्यर विद्या मंदिरपासून वाहत जाणारा ओढा भूतकरवाडीतून सीना नदीस मिळतो. ओढा अनेक ठिकाणी पाईप टाकून बुजविला आहे. मनपा प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ओढाच भूमिगत झाला आहे. आता ओढा शोधणेच कठीण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढा तुंबल्यानंतर नागरिकांच्या घरात पाणी शिरते. ओढ्यावरील अतिक्रमण निश्चित झाले असून, कारवाईसाठी मनपा प्रशासन कोण्याच्या आदेशाची वाट पाहत आहे, असे बोलले जात आहे.

शहरातील ओढ्या नाल्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावर महापलिकेने एका खासगी संस्थेला ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम दिले. संबंधित कंपनीने सर्वेक्षण करून अहवाल मनपाला सादर केला आहे. त्यात रिद्धीसिद्धी अपार्टमेंट-दुर्गादेवी नय्यर विद्या मंदिर-पाईपलाईन रोड-वैष्णो कॉलोनी गार्डन-कोहिनूर मंगल कार्या-जोशी हॉस्पिटल-नरहरीनगर ते मंगल हौसिंग सोसा-बारा इमाम ट्रस्ट-कुष्टधाम रोड-रासनेनगर पूल-कैलास हौउसिंग सोसायटी-मनमाड रोड ते सीना नदीपर्यंत जाणार्‍या ओढ्याचे सर्व्हेक्षण केले आहे.

सावेडी उपनगरातील हा महत्त्वाचा ओढा आहे. पाईपलाईन रोड, श्रीराम चौक, सावेडी नाका, वैदूवाडी, गुलमोहर रोड, प्रोफेस कॉलनी परिसरातील पावसाचे पाणी ओढ्यामध्ये येते आणि पुढे सीनाला जाते. याच ओढ्यावर नागरिकांनी पाईप टाकून बांधकाम, रस्ता केला आहे. कुष्ठधाम रस्ता परिसरात ओढ्याची रुंदीच कमी करण्यात आली आहे. तर, अनेकांनी ओढ्यातच बांधकामे केली आहेत. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षण अतिक्रमणे स्पष्ट झाली आहे. मात्र, याच अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मनपा प्रशासनाने बांधकामासाठी चुकीच्या मंजुर्‍या दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

नाल्यावरच बांधले घर
मंगल हाऊसिंग सोसायटीमध्ये नाल्यावरच घर बांधून बाजूने नाला काढून दिला आहे. भूतकर नगरमध्ये शौचालयच नाल्यावर बांधल्याने नाल्याची रुंदी कमी झाली.

ओढ्यावर कुठे-काय
संत नामदेव चौकाजवळ ओढ्यावर पाईप टाकले. पाईप बुजल्याने प्रवाह खंडित, * नय्यर विद्या मंदिरसमोर ओढ्याचा प्रवाह बंद झाल्याने रस्त्यावरून पाणी, * भक्ती विजय अपार्टमेंट-जवळ ओढा भूमिगत, * पोतनीस नेत्र रुग्णालयपर्यंत 470 मिटरपर्यंत ओढा पाईप टाकून भूमिगत, * वैष्णोकॉलनी गार्डनमधून ओढा भूमिगत वाहत आहे., * कोहिनूर मंगल कार्यालयपर्यंत ओढा पाईपमधून भूमिगत, * पिंपळगाव रोड राजळे बंगलाजवळ ओढा 320 मिटर भूमिगत ड्रेनेजमधूनही वाहत आहे, * कुष्टधाम सेंटरजवळ ओढ्याची रुंदी कमी करून अवघी 1.5 मीटरवर आणली आहे, * विहार अपार्टमेंटपर्यंत ओढा पाईप टाकून 90 मीटर भूमिगत केला आहे, * साई मिडास कॉम्प्लेक्सच्या बाजूला नाला 35 मिटर लांबीमध्ये ड्रेनेजमधून भूमिगत वाहत आहे.

 

Back to top button