राहाता : अतिवृष्टी नुकसानीची मंत्री विखेंकडून पाहणी

राहाता : अतिवृष्टी नुकसानीची मंत्री विखेंकडून पाहणी

Published on

राहाता; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुध्दा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी येणार आहेत. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल आणि कृषि विभागाला देण्यात आले असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मागील दोन दिवसांपासून तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमट, जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह कृषि आधिकार्‍यांसमवेत करुन, शेतकर्‍यांना बांधावर जावून दिलासा दिला. ठिकठिकाणी रस्त्यात थांबलेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधून शेतकर्‍यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली.

काढणीला आलेले द्राक्षांचे घड गारपिटीने फुटले आहेत, बाजारात त्याची विक्री होणार नाही, अनेक द्राक्ष उत्पादकांनी व्यापार्‍यांना बोलावून आपले व्यवहारही ठरविले होते. परंतु या सर्व नैसर्गिक आपत्तीने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या शेतकर्‍यांनी आपली कैफीयत अतिशय हाताशपणे मंत्र्यांपुढे मांडली.

यासर्व संकटात राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे आश्वासित करुन मंत्री विखे पाटील म्हणाले की, कृषिमंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदतीचे पॅकेज आपण दिले होते. याच धर्तिवर अशी काही मदत द्राक्ष उत्पादकांना करता येईल का? याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निश्चित करु. याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी कृषि आणि महसूल विभागाला दिल्या. पंचनामे करतांना गारपीटीचे फोटो आवश्य जोडावे, असेही त्यांनी आधिकार्‍यांना सुचित केले.

पाहाणी दौर्‍यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्री साईबाबा संस्थानच्या सभागृहात आढावा बैठकही झाली. या बैठकीला राहाता, कोपरगाव, संगमनेर या तीनही तालुक्यांचे महसूल आणि कृषी विभागांचे वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. तालुका निहाय झालेल्या नुकसानीची आकडेवारी त्यांनी जाणून घेतली. वादळी वार्‍याने वीजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या आहेत, त्याची जोडणी तातडीने करुन, वीजप्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व नुकसानीचा अहवाल समन्वयाने तयार करावा, मागील नैसर्गिक आपत्तीमधील वंचित शेतकर्‍यांची माहिती घेतली.

एक रुपयातील पीक विम्याची व्याप्ती वाढविणार
सातत्याने होणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक मदत करण्यातही मर्यादा आल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पीक विमा योजनेचे नवे सर्वंकश धोरण आणले आहे. शेतकर्‍यांना कोणताही आर्थिकभार न देता 1 रुपयात विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या पिक विमा योजनेची व्यापकता वाढवून शेतकर्‍यांना सरंक्षण देण्यासाठी आता पाऊल टाकावी लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीकडे दुर्लक्ष नाही ः मंत्री विखे
आम्ही आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला गेलो असलो तरी, राज्यातील नैसर्गिक आपत्तीकडे कोणतेही दुर्लक्ष आमचे झालेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वजण पाहाणी दौर्‍यासाठी बाहेर पडले आहेत. या नैसर्गिक संकटात टीका टिपण्णी करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सूचना कराव्यात, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news