नगर : फायनान्स कंपनीने परस्पर विकला ट्रॅक्टर | पुढारी

नगर : फायनान्स कंपनीने परस्पर विकला ट्रॅक्टर

नगर; पुढारी वृत्तसेवा : फायनान्स कंपनीकडून ट्रक्टर खरेदी केल्यानंतर पहिला हप्ता भरण्यास उशिर झाला. त्यामुळे फायनान्स कर्मचार्‍यांनी ट्रक्टर ओढून नेला. पैसे भरण्यासाठी शेतकर्‍यांनी कार्यालयात हेलपाटे मारले. एक महिना झाला तरी टॅक्टर मिळत नसल्याने चौकशी केली असता कंपनीने परस्पर ट्रॅक्टरची विक्री केल्याचे समोर आले. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले.

नितीन शिवाजी बेरड (रा. दरेवाडी, ता. नगर) असे शेतकर्‍याचे नाव आहे. बेरड यांनी शेतजमीन कसण्याकरिता पैसे साचून फायनान्सच्या माध्यमातून नवीन ट्रॅक्टर घेतला. काही अडचणीमुळे पहिला हप्ता भरण्यासाठी उशीर झाल्याने फायनान्सच्या कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टर ओढून नेला. त्यानंतर शेतकरी नितीन बेरड हे वारंवार कार्यालयात पैसे भरण्यासाठी जात असून अधिकारी टोलवाटोलवी करीत होते. माजी सरपंच अनिल करंडे यांनी देखील फायनान्सच्या अधिकार्‍यांना फोन लावून अधिकार्‍यांना विचारणा केली.

त्यांनी मार्च झाल्यावर आम्ही ट्रॅक्टर देऊ, असे सांगितले. मार्च महिना उलटून देखील ट्रॅक्टर मिळाला नाही. अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता ट्रॅक्टरचा निलाव करून विकला, असे सांगण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर ट्रॅक्टर विकला या निषेधार्थ राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने फायनान्सच्या कार्यालयात धरणे आंदोलन करून कार्यालय बंद करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर, दरेवाडीचे माजी सरपंच अनिल कारंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, आकाश कोथिंबिरे, अभिजीत भांडवलकर, नितीन बेरड, राजेश तुषारे, योगेश बेरड, देविदास टेमकर उपस्थित होते.

Back to top button