राहुरी : ऋषिकेशने ओढला बारा बैलगाड्यांचा गाडा | पुढारी

राहुरी : ऋषिकेशने ओढला बारा बैलगाड्यांचा गाडा

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडार्‍याची उधळण करत खंडोबा यात्रेला 9 एप्रिल रोजी सुरुवात झाली. शेकडो भक्तांनी पुणतांबा येथून कावडीने आणलेल्या जलाने राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांना जलाभिषेक करण्यात आला. नगर- मनमाड रोडवर लहान मुले तसेच माणसांनी भरलेल्या बारा गाड्या ओढण्याची किमया ऋषिकेश शेटे यांनी साधली.
रविवार 9 एप्रिल रोजी सकाळी कावडी भक्तांची राहुरी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

कावडी भक्तांना पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सदाशिव शेळके तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक वामन, उपाध्यक्ष हरिभाऊ उंडे, आकाश येवले, खजिनदार अमोल तनपुरे, नारायण धोंगडे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, विलास वराळे, पाराजी तनपुरे, सुनील पवार, सचिन तनपुरे, दादासाहेब तोडमल, संदीप तमनर, अमोल उंडे, गोरक्षनाथ चव्हाण, गणेश खैरे, सोन्याबापू जगधने, राजेंद्र उंडे, राजू शेळके, तात्या काशीद यांनी कावडी भक्तांचे स्वागत केले.

नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी कावडी भक्तांना सरबत व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तर यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जलस्नानानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. सायंकाळी भंडार्‍याची उधळण करत बारा गाड्या ओढण्यात आल्या. तर रात्री आठ वाजता ज्योत मिरवणूक व सोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री बारा वाजता मुळानदी पात्रामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यात्रेनिमित्त पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंद ठेवण्यात आला आहे.

कुस्त्यांसाठी 18 लाखांचे बक्षीस
राज्यातून व राज्याच्या बाहेरून कुस्त्यांसाठी मल्ल राहुरी येथे दाखल होत आहे. पहिल्या दोन कुस्त्यांसाठी सुमारे तीन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असून 3 नंबर कुस्तीसाठी दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कुस्त्यांसाठी सुमारे 18 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. कुस्त्यांचे नियोजन जुन्या बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या बियाणी मळ्यात करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी कुस्त्या पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी केले आहे.

Back to top button