श्रीकांत राऊत
नगर : रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून पादचार्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यासह शहरात गेल्या वर्षभरात 770 अपघाताच्या घटनांमध्ये 'हिट अॅन्ड रन'मध्ये 374 जणांचा बळी गेला असून, 281 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग व संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. परंतु, अद्यापि अपघातांना आळा घालण्यात हवे तसे यश मिळालेले नाही. अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच, वाहनाची धडक देवून पळून जाणार्यांवर कोणाचाच 'वॉच' नसल्याचे चित्र आहे. अशा अपघातात निरपराधी पादचार्यांचे हकनाक बळी जात आहेत.
मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होत आहेत. शहरासह जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आहे. महामार्गांमुळे नगरकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे. परंतु, भरधाव वेगाने वाहने चालवून निरपराध वाहनचालकांना धडक देवून पळून जाणार्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षभरात 770 वाहनांच्या धडकेत 374 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यासोबतच 281 जण गंभीर जखमी झाले तर 115 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच 770 अपघातांमध्ये दोन हजार 632 वाहनांचे नुकसान झाले आहे.
मयत, जखमींना अशी मिळते मदत
अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमींना सरकार कडून आर्थिक मदत केली जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अपघाती कोर्टात आर्थिक मदतीसाठी दावा दाखल करावा लागतो. अपघातात मृत्यू झालेल्या मयताच्या वारसांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. तर गंभीर जखमींसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत केली जाते.मात्र, अपघातात मयत किंवा जखमीच्या वाहनाचा विमा काढलेला असणे गरजेचे असते.
284 वाहनांचा लागेना थांगपत्ता
अपघाताची घटना घडल्यानंतर पळून जाणार्यांची संख्या मोठी आहे. पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी काहीजण घटनास्थळावरून पळ काढतात. वाहनाला धडक देवून पळून जाणार्या 284 वाहनांचा शोध पोलिसांना अजूनही लागलेला नाही. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान 'हिट अॅन्ड रन'च्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घटनास्थळावरून पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध पोलिस सीसीटीव्ही, प्रमदर्शनींनी दिलेल्या माहितीवरून घेतात. परंतु, काही वाहनांवर असलेल्या नंबरप्लेट चुकीच्या असतात, त्यामुळे वाहनचालकाचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असते.
अपघातांची आकडेवारी
मृत्यू 374
गंभीर जखमी 281
किरकोळ जखमी 115
एकूण 770