

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मवेशी शैक्षणिक संकुलाच्या निवासी आश्रमशाळेतील गलथान कारभाराच्या विरोधात अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी सोमवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेतली. यावेळी मवेशी संकुलातील दोषी मुख्याध्यापकासह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सुनिता भांगरे या मंगळवारी राजूर प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
जिल्ह्यातील आदिवासीं विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सोई सुविधा मिळाव्यात म्हणून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूरमध्ये आहे. मवेशी आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक संकुलामध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे १२०० विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यातच निवासी आदिवासी आश्रम शाळेचा गलथान कारभार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माजी अध्यक्षा सुनिता भांगरे यांनी पालक, ग्रामस्थांसह मवेशी शैक्षणिक संकुलातील इंग्रजी व मराठी माध्यम आश्रम शाळा, आदर्श शासकीय आश्रम शाळा, एकलव्य शासकीय आश्रम शाळेला भेट दिली होती. या भेटीत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.
तसेच नववीच्या मुलांची परीक्षा वर्गात सुरू असताना पर्यवेक्षक कोणी नसल्याने विद्यार्थी पुस्तकात पाहून पेपर लिहिताना दिसून आले होते. तसेच शाळेच्या बाजूलाच फेकलेल्या अन्नामध्ये किडे व आळ्या झाल्याने मोठी दुर्गंधी पसरली होती. शिक्षण, जेवण, स्वच्छतेचा अभावी आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड चक्क प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांच्यासमोर उघडकीस आली होती.
या पार्श्वभूमीवर आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अधीक्षक, मुख्याध्यापकासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता भांगरे या मंगळवारी राजूर प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.