बँकांमध्ये ग्राहकांचे होताहेत हाल ; या अडचणींंना जावं लागत आहे सामोरं ! | पुढारी

बँकांमध्ये ग्राहकांचे होताहेत हाल ; या अडचणींंना जावं लागत आहे सामोरं !

सावेडी : पुढारी वृत्तसेवा : शहरासह सावेडी उपनगरात राष्ट्रीय व खासगी बँकांची मोठी संख्या आहे. बँकेत येणार्‍या ग्राहकांना सुविधा पुरवणे प्रत्येक बँक व्यवस्थापनाचे कर्तव्य असून, याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह उपनगरात राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी बँकेची मोठी संख्या आहे. सरकारने जन-धन योजनेतंर्गत सर्व सामान्य नागरिकांचे बहुतांश व्यवहार बँकिंग केल्याने अनेकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत यावे लागते. मात्र, बँकेत पैसे भरणे व काढणे, स्टेटमेंट, पेन्शनसाठी आल्यास बँकेमध्ये एकमेव कॅश काउंटर दिसून येत आहे. त्यामूळे ग्राहकांना तासून, तास रांगेत उभे राहावे लागते. अनेक बँकांमध्ये ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले. सावेडीतील एसबीआय बँकेत ग्राहकांच्या रांगा होत्या, तर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्राहक घरूनच पिण्याचे पाणी घेउन आल्याचे दिसून आले.

बँकेतील खातेदारांसाठी एकच कॅश काऊंटर ठेवण्यात आल्याने ग्राहकांची पिळवणूक होत आहे. ग्राहक हा राजा आहे. मात्र, बँकेत ग्राहक गेल्यानंतर कितीही गर्दी झाली तरी त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी प्रत्येक बँकेत कॅश काऊंटर वाढविण्यात यावेत. अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

दुबार एटीएम कार्डसाठी लागताहेत तीन महिने
भारतीय स्टेट बँकेत एटीएम कार्ड खराब झाल्यास दुसरे कार्ड घेण्यासाठी अर्ज देऊन तीन महिने उलटले तरी कार्ड देण्यात आले नाही. असे एका ग्राहकाने सांगितले.

Back to top button