नगर : ओढ्यातील पाईप हटविण्यास मुहूर्त मिळेना | पुढारी

नगर : ओढ्यातील पाईप हटविण्यास मुहूर्त मिळेना

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बोल्हेगाव, केडगाव, सावेडी उपनगरातील सुमारे 40 ओढे बुजवून प्लॅट टाकण्यात आले आहेत. पाईप टाकून ओढे बुजविले आहे. ओढ्यांवर टाकण्यात आलेले पाईप येत्या आठ दिवसांत काढले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांना दिले होते. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी अद्यापि अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली नाही.
अहमदनगर शहरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर पाईप टाकून ते बुजविण्यात आहेत.

तर, ओढ्यांमध्ये बांधकामे झाली आहेत. याबाबत नाशिक येथील एका बाह्य संस्थेला सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. संबंधित संस्थेने सर्व्हेक्षण करून सुमारे 40 ठिकाणी पाईप टाकून ओढे बुजविण्यात आले आहेत. तर, ओढ्यातच बांधकामे झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यावर 29 मार्च रोजी झालेल्या विशेष महासभेमध्ये नगरसेवक व अधिकार्‍यांमध्ये चांगलेच घमासन झाले. नगरसेवकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरल्यानंतर आयुक्तांनी अतिक्रमणे निश्चित झाली असून, ओढ्याची हद्द निश्चित करणे बाकी आहे. येत्या आठ दिवसांत ओढ्यावर टाकलेली पाईप काढण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्याक्षात दहा दिवस झाले तरी अद्याप ओढ्यावरील पाईप हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुक्तांचे आश्वासन हवेतच विरल्याचे बोलले जात आहे.

पत्राशेड जैसे थे
शहरातील मुख्य रस्ता, डीपी रोड, उपनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करून रस्त्यावर पत्राशेड झाल्याची तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला मोजणी करण्याचा आदेश दिला होता. त्या मोजणीत प्रभाग समिती तीन वगळता सुमारे 232 जणांनी रस्त्यावर पत्राशेड करून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र,अतिक्रमणे जैसे थे आहेत.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
महापालिका हद्दीत यापूर्वी ओढ्यांवर काही प्लॉटला मंजुरी देण्यात आली आहे. ते सर्व्हेक्षणात स्पष्ट झाल्यानंतर आयुक्तांनी संबंधित प्लॉटवर बांधकामाला परवानगी देऊ नये, असा आदेश दिला होता. मात्र, त्याकडेही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा बांधकाम वर्तुळात आहे.

Back to top button