नगर जिल्ह्यात 8 हजार 645 हेक्टर पिके वाया ; 16 हजार शेतकर्‍यांना आर्थिक फटका | पुढारी

नगर जिल्ह्यात 8 हजार 645 हेक्टर पिके वाया ; 16 हजार शेतकर्‍यांना आर्थिक फटका

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत अवकाळी पावसाने कहर केला. 97 गावांतील 8 हजार 645 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके, फळबागा यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या तडाख्याचा आर्थिक फटका 16 हजार 407 शेतकर्‍यांना बसला आहे. नेवासा, शेवगाव, नगर, राहुरी, कर्जत या तालुक्यांत अधिक नुकसान झाले. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असतानाच शुक्रवारी (दि.7) शेवगाव, नेवासा, नगर, राहुरी, पाथर्डी , पारनेर या तालुक्यांत वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावीत रब्बी पिके आणि फळबागांची नासाडी केली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 50 गावांतील 6 हजार 685 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकससान झाले. याचा फटका 12 हजार 483 शेतकर्‍यांना बसला आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील 29 गावाचा समावेश आहे. या तालुक्यातील या पावसाने 4 हजार 300 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

शेवगाव तालुक्यातील 14 गावांतील 2 हजार 197 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 3 हजार 673 शेतकर्‍यांना बसला आहे. शनिवारी 1960 हेक्टर नुकसान अवकाळी पावसाने दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.8) देखील नगर, कर्जत, राहुरी व संगमनेर तालुक्यांना झोडपून काढले. संगमनेर तालुक्यातील काही भागात गाराचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने चार तालुक्यातील 47 गावांतील 1 हजार 960 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान केले. याचा आर्थिक फटका 3 हजार 924 शेतकर्‍यांना बसला आहे.

यामध्ये सर्वाधिक नगर तालुक्यातील 31 गावांतील 1 हजार 176 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. राहुरी तालुक्यातील 5 गावांतील 348 हेक्टर क्षेत्रावरील तसेच संगमनेर तालुक्यातील 8 गावांतील 280 हेक्टर व कर्जत तालुक्यातील 156 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत शासनाकडे अहवाल देखील पाठविला आहे. या दोन दिवसांच्या नुकसानीत गहू, कांदा, द्राक्षे, संत्रा, डाळिंब, सोयाबीन, मका उन्हाळी बाजरी या पिकांचा समावेश आहे. अंतिम अहवालात नुकसानीच्या क्षेत्राची संख्या रोडावली जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारचा सर्कलनिहाय पाऊस (मि.मी.)
सावेडी 12, केडगाव 11.3, नागापूर 4.3, जेऊर 18.8, भाळवणी 11.3, वडझिरे 12.5, टाकळी 20.5, पळशी 6.8, पारनेर 6.8, ढोरजळगाव 12.3, भातकुडगाव 5.3, मिरी 27, घोडेगाव 39.8, चांदा 27.5, वडाळा 10.8, कुकाणा 5.3, वांबोरी 17.3, ब्राम्हणी 25, टाकळीमियाँ 8.5, ताहाराबाद 8.

शनिवारचा पाऊस
सावेडी 17.5, केडगाव 6.4, नागापूर 13.5, जेऊर 39.8, नालेगाव 5, भाळवणी 6.8, मांडवगण 4.8, राशीन 4.5, कोंभळी 48.5, मिरजगाव 36.5, टाकळी 13, धांदरफळ 17.8, साकूर 3.3.

शनिवारी झालेले हेक्टरी नुकसान
अहमदनगर : 1176
कर्जत : 156
राहुरी : 348
संगमनेर : 280

Back to top button