सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस ! नेवाशातील शेतकरी हतबल ! | पुढारी

सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस ! नेवाशातील शेतकरी हतबल !

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदे, मका, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील शेतकर्‍यांना निसर्गाच्या संकटांचे सतत धक्क्यावर धक्के बसत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक गारा, तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह शुक्रवारी जोरदार पाऊस झाला असून, यामध्ये कांदा, मका, गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके भूईसपाट झाली आहेत.

मागील नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसून त्यातच शेतकर्‍यावर वारंवार अस्मानी संकट येत आहे. त्यामुळे शेतकरी राजा पूर्णतः कोल मोलडून पडला आहे. आता, या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसाना बद्दल शासन काय निर्णय घेतेय याकडे लक्ष लागले आहे.
कुकाणा व भेंडा परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात आलेल्या अवकाळी संततधार पावसाने सर्वत्र पाणचपाणी केले. अनेकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर काही ठिकाणी विजा पडल्या. गाव व शिवारात ओढ्या सारखे पाणी वाहिले. कुकाण्यासह चिलेखनवाडी, देवगाव, तेलकुडगाव, भेंडा बुद्रूक व भेंडा खुर्द, तरवडी, देडगाव, फत्तेपूर, शहापूर, वडूले, जेऊर हैबती शिवारात संततधार पावसाच्या सरी कोसळल्या.

दुपारी चार वाजेपर्यंत कडक ऊन होते. चार वाजता वादळी वार्‍यासह विजाच्या कडकडात पाऊस सुरू झाला. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर होता. कुकाणे व भेंडा बस थांब्यावर पाण्याचे डोह पावसाने तयार झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी कांदा शेतात काढून पडला तोही सडणार आहे. झाडांच्या कैर्‍या गळून पडल्या, तर मका पिक जागेवरच आडवे झाले. काढणीस आलेला गहू पिकात पाणी झाले. कुकाणा- शेवगाव, कुकाणा – नेवासाफाटा, कुकाणा – दहिगाव व कुकाणा – घोडेगाव मार्गावर रस्ता धुतर्फ अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

वडूल्यात मोठे नुकसान
वडूल्याचे सरपंच दिनकरराव गर्जे यांनी माजी सरपंच बाबासाहेब आतकरे, गंगाधर गर्जे, लक्ष्मण भारस्कर, दादासाहेब उभेदळ, पोपट उभेदळ, अशोकराव जर्‍हाड, बबनराव देशमुख, सुनील पवार या शेतकर्‍यांच्या घरावर झाडे उन्मळून पडली. अंबादास बडे, आजीनाथ कल्हापुरे यांचे अनुक्रमे लिंबोणी, डाळींबाचे मोठे नुकसान झाले. ज्ञानदेव भागवत, शिवाजी आतकरे यांंचे अतोनात नुकसान झाले. विनायक सरोदे, शहाराम सांगळे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांचे बाजरीचे नुकसान झाले. सरपंच दिनकरराव गर्जे यांनी प्रांत श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार संजय बिरादार सर्कल फुलमाळी, कामगार तलाठी बाबासाहेब विरकर, ग्रामसेविका भाग्यश्री कदम, कृषी सहायक भागवत याना फोनवरून त्वरित माहिती दिली. उपसरपंच ज्ञानेश्वर देवढे, वल्लभराव गर्जे, अरूण आतकरे, शिवराम आरोटे, अशोक भाऊसाहेब गर्जे, काकासाहेब खाटिक, संतोष ढोकणे आदी शेतकर्‍यांनी सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली.

Back to top button