नगरमधील शेवगाव-नेवाशात अवकाळीचे तुफान ! | पुढारी

नगरमधील शेवगाव-नेवाशात अवकाळीचे तुफान !

शेवगाव/भेंडा : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-नेवासा तालुक्यांत शुक्रवारी विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यासह अवकाळीची तुफान बरसात झाली. तुफानी पावसाने शेतात पाणी साचले. भर उन्हाळ्यातही ओढे-नाले वाहते झाले. गारपिटीने काढणीला आलेला कांदा, गहू या पिकांचे नुकसान झाले. वादळात अनेकांच्या घरांवरील पत्र्याचे छत उडाले. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक गावे अंधारात बुडाली. अचानक आलेल्या पावसाने व्यावसायिकांसह शेतकर्‍यांची धांदल उडाली. अवकाळीचे ढग दाटून आल्याने रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

भेंडा-कुकाणा परिसरात शुक्रवारी (दि.7) दुपारी वीजेच्या कडकडाटात तुफान अवकाळी पाऊस बरसला. तासभर सुरू असलेल्या पावसाने ओढे, नाले भर उन्हाळ्यातही वाहते झाले. चिलेखनवाडीत वीज पडली तर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही वेळ गारा पडल्यानंतर पावसाने जोर धरला. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचले. ओढे, नाल्यांनाही पाणी आले. वादळी वार्‍याने झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकही बंद झाली. चिलेखनवाडीत झाडावर विज पडली.

भेंडा, कुकाणा, देवगाव, जेऊर हैबती, तरवडी, गोंडेगाव, अंतरवाली, चिलेखनवाडी परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे तसेच इतर व्यावसायिकांची धांदल उडाली. साहित्याची आवरा आवर करताना व्यवसायिकांची तर शेत माल झाकण्यासाठी शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेले कांदे, गहू पावसाने भिजल्याने नुकसान झाले. जोरदार पावसाने शेतात पाणी साचले. ओढे- नाल्यांना पाणी वाहू लागल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. काही ठिकाणी विजांच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

शेवगाव तालुक्यातील शुक्रवारी शहरटाकळी, दादेगाव परीसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला. वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. वादळामुळे अनेक गांवात वीज पुरवठा खंडीत झाला होता. गारपीटाच्या पावसाने काढणीस आलेल्या गहू,कांदा, उन्हाळी बाजरी,आंबा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढवले आहे.
शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान या परिसरात वादळ सुरु झाले आणी अचानक ढगांची दाटी झाली व काही क्षणात जोरदार वार्‍यासह विजेचा कडकडाटात अवकाळी पाऊस सुरू झाला.

शहरटाकळी येथील दत्त वस्तीवरील राजेंद्र रणधीर व भाविनिमगाव येथील माधव चेडे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. त्यानंतर हलक्या पावसाला सुरवात झाली. काही मिनिटात पावसाचा जोर वाढला. पावसात भातकुडगाव, शहरटाकळी, दादेगाव परिसरात गारा कोसळल्या. सुमारे दिड तास अवकाळीचा तुफान पाऊस सुरू होता. शेवगाव शहरासह इतरत्र हलक्या सरी कोसळल्या. मठाचीवाडी, शहरटाकळी, दहिगाव-ने, भाविनिमगाव, भायगाव, जोहरापूर, दादेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला.

भेंडा बुद्रुक गट यार्डात राहणार्‍या सचिन शिवाजी गव्हाणे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे वादळात उडाले. देवगाव रस्त्यालगत राहणार्‍या शुभम बाबासाहेब कदम यांच्या घराचे पत्रे उडाले. त्यामुळे घरात पाणी साठले. तसेच समिंद्राबाई पांडुरंग बनसोडे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडाले. भाऊसाहेब खंडागळे यांच्या घराची भिंत पडली.

कुकाणा-देवगाव रस्ता बंद
कुकाणा-देवगाव रस्त्यावर हरीहरनगर जवळील खराडे वस्तीनजीक वडाच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्याने कुकाणा-घोडेगाव रस्त्याची वाहतुक बंद झाली. तसेच हरीहरनगर पाटी जवळ जेऊर रस्त्यावरच मोठे झाड आडवे पडल्याने तो रस्ता पूर्णपणे बंद झाला.

घराजवळच कोसळली वीज
ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटात आवकाळीची जोरदार हजेरीने अनेकांची भितीने गाळण उडाली. सायंकाळी साडेपाच वाजेनंतरही जोरात पाऊस झाला. चिलेखनवाडी येथे सरपंच भाऊसाहेब सावंत यांचे घराजवळील नारळाच्या झाडावर विज पडल्याने झाडाने पेट घेतला.

नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
नगर शहरातही सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुळा धरण परिसरात जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस पडला. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला. परिणामी नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. अवकाळी पावसाने शहर पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Back to top button