महिला साईभक्तांचे गंठण शिर्डीत लांबविले | पुढारी

महिला साईभक्तांचे गंठण शिर्डीत लांबविले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  साई दर्शनसाठी आलेल्या दोन महिला भाविकांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी ओरबाडून नेले. दोन्ही घटनांमधून सुमारे 2 लाखांहून अधिक रक्कमेचे सोने या भामट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत पहिल्या घटनेत महालक्ष्मी येरामिल्ली (वय 55, रा. मियापूर, हैदराबाद) ही साईभक्त महिला दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 5.45 च्या सुमारास साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी जात असताना हॉटेल गोरडिया जवळ आल्या असता समोरून दोघेजण दुचाकीवरून आले. या महिलेजवळून त्यांनी ‘यु’ टर्न मारीत या महिले जवळ दुचाकी आणली. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील गंठण ओढून पसार झाले.

त्याची किंमत सुमारे 1 लाख 37 हजार आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत दोघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्‍या घटनेत प्रज्ञा शांताराम ब्रीद (वय 74) ही महिला कृष्णजा रेसिडेन्सी, शिर्डी येथे राहणारी असून मुळची ही महिला मुंबईची आहे. श्रीरामनवमी उत्सव असल्याने ही महिला शिर्डी येथे आली होती. दि. 6 एप्रिल रोजी रात्री 10 च्या सुमारास साईबाबांचे दर्शन घेऊन घरी येत असताना हॉटेल ‘साई निम ट्री’ समोर दुचाकीवरून दोघे त्यांच्याजवळ आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबाडले. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.

Back to top button