नगर : एटीएम फोडून 27 लाख लंपास ; चोरांनी गॅस कटरने कापले मशीन | पुढारी

नगर : एटीएम फोडून 27 लाख लंपास ; चोरांनी गॅस कटरने कापले मशीन

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 27 लाख रुपयांची रक्कम लंपास केली. शुक्रवारी (दि. 7) पहाटे तीनच्या सुमारास ही चोरी झाली. विशेष म्हणजे लोणीव्यंकनाथमध्ये हेच एटीएम फोडण्याची ही चौथी वेळ आहे. पहाटे तीनच्या दरम्यान दोन बुरखाधारी चोरट्यांनी आधी एटीएम असलेल्या गाळ्याचे वीज कनेक्शन कापले. त्यात शेजारच्या शिवशंभो कापड दुकानाचाही वीजप्रवाह खंडित झाला. एटीएमच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरा हाताने फोडून चोरांनी एटीएममधील रक्कम ठेवण्याचे लॉकर गॅस कटरच्या साह्याने कापले आणि त्यातील सुमारे 27 लाखांची रक्कम घेऊन ते पसार झाले.

आज सकाळी नऊ वाजता शिवशंभो कापड दुकान उघडण्यासाठी सुहास काकडे आले असता, दुकानातील वीजप्रवाह खंडित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना खबर दिली. पाहणी केल्यानंतर एटीएम फोडल्याचेही लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अमित माळी व कॉस्टेबल व्ही. एम. बडे यांनी एटीएमची पाहणी केली. या एटीएममध्ये गुरुवारी दुपारी 32 लाख रुपयांची रक्कम टाकली होती. सुमारे पाच लाखांची रक्कम ग्राहकांनी काढली असावी, त्यामुळे सुमारे 27 लाख रुपये चोरीस गेले असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चौथ्यांदा फोडले हेच एटीएम
स्टेट बँकेचे हे एटीएम नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर आहे. आतापर्यंत हेच मशीन चार वेळा चोरट्यांनी फोडले आहे. मागील वेळी चोरट्यांनी मशीनच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने चोरटे मशीन सोडून पळून गेले होते. पोलिस तपासात हे चोरटे राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले होते.

 

Back to top button