नगरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात | पुढारी

नगरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 6) बजरंग दलाच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी जय श्रीराम-जय हनुमान अशा घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दुमदुमला होता. डीजे आणि डॉल्बीवर थिरकत तरुणाईने जल्लोष केला.
हनुमान जयंतीनिमित्त यंदा पहिल्यांदाच शहरात मिरवणूक काढण्यात आली. नामांतर मागणीबाबत ‘आमचं नगर, अहिल्यानगर’ अशा घोषणाही शोभायात्रेत देण्यात आल्या. आमदार नीलेश लंके यांनीही शोभायात्रेत उपस्थिती लावली.

आधी या शोभायात्रेला पोलिसांतर्फे परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी परवानगी देण्यात आली. शहरातील डाळ मंडई भागातील राममंदिरात हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी साडेचार वाजता शोभायात्रा सुरू झाली. त्यात महिलांसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान, वारूळवाडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, शोभायात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

शोभायात्रा मार्गावर ‘फिक्स पॉइंट’
पोलिसांकडून शोभायात्रा मार्गावर संवेदनशील चौकात फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. तेथे पोलिस अंमलदार सकाळी नऊपासून हजर होते.

Back to top button