नगरमधील जवळ्यात दीड तास दरोडेखोरांचा धुमाकूळ | पुढारी

नगरमधील जवळ्यात दीड तास दरोडेखोरांचा धुमाकूळ

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  रात्रीचे दीड वाजलेले…अचानक घरात डोळ्यासमोर 10 ते 12 अनोळखी पुरुष उभे राहतात. अन् काही कळायच्या आत, घरातील महिलांच्या गळ्याला धारदार सशस्त्र लावतात आणि दागिन्यांची मागणी करतात. यानंतर घाबरून जात त्या दोनही महिला आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून त्या दरोडेखोरांना देतात. एवढ्यावरच दरोडेखोर थांबले नाही, तर त्यांनी महिलांना मारहाणही केली. हा सर्व थरार पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता.

दरोडेखोरांनी दागदागिने व रोख रकमेसह तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर तालुक्यातील जवळा परिसरातील पठारे कुटुंबीयांचे घर आहे. या घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेरगावी असतात. याचा फायदा उचलत 10 ते 12 दरोडेखोरांनी गुरुवारी (दि.6) रात्री दीडच्या सुमारास पठारे यांच्या घरावर दरोडा टाकला. यात या दरोडेखोरांनी अंदाजे तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

गुरुवारी (दि.6) पहाटे वस्तीवर घरात रंजना शहाजी पठारे व त्यांच्या सून आणि तीन वर्षाचा लहान मुलगा होता. शेतीची दैनंदिन कामे उरकून जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले असताना रात्री दीड वाजता 10 ते 12 काळेकपडे माकडटोप्या व हातमोजे परिधान केलेल्या चोरट्यांनी ग्रीलचा दरवाजा कटवणीने तोडून घराच्या मुख्य दरवाजावर जात्याचा दगड मारून दरवाजा तोडला अन् घरात प्रवेश केला. मोठा आवाज झाल्याने रंजनाबाईना जाग आली. प्रथमतः भांबावलेल्या अवस्थेत त्यांना काही सूचेना. इतके लोक कसे काय घरात आले, हे त्यांना समजेना, तेवढ्यात एका दरोडेखोराने मोबाईल काढून घेत दोन्ही महिलांच्या मानेला सुरा लावत, ‘ओरडला तर खलासच करीन, गप्प बसा, जवळ जे काही असेल ते काढून द्या, नाही तर खलास करून टाकू, नाही तर तुमच्या बाळाला फेकून देऊ,’ असे म्हणत त्या दरोडेखोरांनी दमदाटी करून मारहाण केली.

यावर रंजनाबाई म्हणाल्या, ‘तुम्हाला हवं ते न्या, परंतु आमच्या बाळाला व आम्हाला मारू नका,’ घाबरलेल्या रंजानाबाईनी अंगावरील सर्व दागिने काढून दरोडेखोरांना दिले. यानंतर काही दरोडेखोरांनी आतल्या खोलीत प्रवेश करत कपाटांची तोडफोड करून उचकापाचक केली. सुमारे 10 ते 12 तोळे सोने, रोख रक्कम, असा तीन लाखांपर्यंतचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच नुकतेच पारनेरला रुजू झालेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले. परिसथितीची बारकाईने पाहणी करीत तपासाच्या दृष्टीने जलद सूत्रे फिरवली.

यावेळी श्वान, ठसेतज्ज्ञ आदींची मदत घेतली गेली. हातमोजे, पायमोजे, माकड टोप्या घालून दरोडेखोर आल्याने ते सराईत असावेत, असा कयास निघत असून, या घटनेचा तपास लावण्याचे, तसेच पारनेर तालुक्यातील चोर्‍या, दरोडे, गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

नवनियुक्त पोलिस निरीक्षकांना चोरट्यांची सलामी
पारनेर तालुक्यातील जवळा येथे पठारे वस्तीवर 10 ते 12 जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत गळ्याला सुरा लावत घरातील महिलांना मारहाण केली अन् दागिने घेऊन पसार झाले आहेत. यामुळे पारनेरला नवीन रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांना चोरट्यांची पहिलीच सलामी दिली. तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

कुकर, कोंबड्या अन् मसाल्याचे डबे नेले
जाताना दरोडेखोरांनी घरातील कुकर, खुराड्यातील कोंबड्या, अंडी, मसाल्याचे डबे, असे साहित्यही घेऊन गेले.

Back to top button