नगर : शेळ्या चोरणारी बीडमधील टोळी उघड ; चोरट्यांत माजी सरपंचही | पुढारी

नगर : शेळ्या चोरणारी बीडमधील टोळी उघड ; चोरट्यांत माजी सरपंचही

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेळ्या चोरणारी बीड जिल्ह्यातील सहा जणांची टोळी उघड करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. या चोरीच्या गुन्ह्यात एका माजी सरपंचाचा समावेश असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील घाटशिरस येथील अरुणा दिलीप गर्जे या ज्येष्ठ महिला 2 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी आपल्या 29 शेळ्या घेऊन घरी येत असताना एका टोळीने त्यांना अडवले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेत, 29 शेळ्या टेम्पोमध्ये भरून पळवून नेल्या होत्या. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी आधी करडवाडीतील एका संशयिताला अटक केली होती.

त्याने काहीच माहिती दिली नाही. मात्र, त्याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल तपासले, तेव्हा बाळेवाडीचा माजी सरपंच हनुमंत अर्जुन पठारे (वय 45) याची माहिती मिळाली. त्यावरून पठारेला अटक केली. तो बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात अटकेतहोता. त्याने शेळ्या चोरल्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन व त्याच्या पाच साथीदारांची माहितीही समजली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात दरोड्याचे कलम वाढविले आहे. आरोपींनी या शेळ्या बाजारात विकून पैसे वाटून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. यातून शेळ्या चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक कौशल्य राम निरंजन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अरविंद चव्हाण व सतीश खोमणे यांनी हा तपास केला.

Back to top button