…तर ‘त्या’ सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करा ! स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा आढावा | पुढारी

...तर ‘त्या’ सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करा ! स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा आढावा

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्र तसेच रुग्णालयांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आरोग्य विषयक विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप इंगळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्रांची अचानकपणे तपासणी करुन दोषी आढळणार्‍या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरीकांनी याकामी सक्रिय होणे आवश्यक आहे

कोव्हीडच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने दक्षता घेत नागरिकांच्या तपासण्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांचे जिनोमिक सिक्वेन्सचे सँपल घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात यावेत. जिल्हा व तालुका रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावी. मुबलक प्रमाणात औषधीसाठा राहील, याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी आवश्यकती काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.

बेकायदेशीर गर्भपात केंद्राची माहिती दिल्यास लाखाचे बक्षीस
जिल्ह्यातील काही तालुक्यांत लिंगगुणोत्तराचे प्रमाण हे जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून, आरोग्य विभागाने याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या केंद्राची माहिती देणार्‍यास शासनाने एक लक्ष रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या योजनेची गावपातळीपर्यंत प्रसिद्धी करण्याच्या सुचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

Back to top button