

सूर्यकांत वरकड :
नगर : अहमदनगर शहराच्या वैभवात भर पडेल अशी नाट्यसंकुलाची इमारत उभी राहत आहे. मात्र, कोट्यवधींचा निधी शिल्लक असूनही केवळ ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गेल्या दहा वर्षांपासून काम रखडलेले आहे. नाट्यसंकुलाचा नुसता सांगडा उभा आहे. येत्या काही दिवसांत काम सुरू होईल, असे मनपाच्या सभागृहात सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात जै थे परिस्थिती आहे.
नगर शहराला मोठी ऐतिहासिक नाट्यपरंपरा आहे. आज राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा शहरात होतात. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळातो. तसेच, विविध नाटकांचे प्रयोगही शहरात होतात. परंतु, महापालिकेचे हक्काचे नाट्यगृह नाही. जिल्हा बँकेचे यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, तलाठी संघटनेचे माऊली संकुल अशी दोन मोठी सभागृहे वगळता शहरात मोठे नाट्यसंकुल नाही. त्यामुळे नाट्य चवळवळीची मोठी कुचंबना होता. नगर शहरात हक्काचे नाट्यसंकुल असावे अशी नगरकरांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
त्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील नगररचना योजना चार अंतिम भूखंड 129 वर नाट्यसंकुल उभारण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीला या प्रकल्पाची 12.47 कोटी किंमत होती. तर, स्थापत्य कामाची किंमत 7 कोटी 22 लाख होती. सुरुवातीला 500 आसन क्षमतेचे नाट्यसंकुल उभारण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर जास्तीत जास्त आसन क्षमतेचे बनवावे अशी मागणी होऊ लागल्याने पुन्हा 500 आसनांची क्षमता वाढविण्यात आली.
त्यामुळे आता एकूण 1000 आसन क्षमतेचे नाट्यगृह उभे राहत आहे. 23 मार्च 2010 रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तेव्हापासून काम सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्र शासन 60 लाख, महापालिका फंड 3 कोटी 15 लाख व आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून जिल्हा नियोजन समितीद्वारे 5 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. एकूण 8 कोटी 75 लाखांचा निधी नाट्यसंकुलासाठी मिळाला आहे. त्यात या प्रकल्पावर अवघा 3 कोटी 21 लाख रुपये खर्च झाला आहे.
सध्या नाट्यसंकुलाचा संपूर्ण सांगाडा उभा करण्यात आला आहे. मध्यंतरीच्या काळात लोखंडासह विविध साहित्याचे दर वाढल्याने ठेकेदाराने काम थांबविल्याचे समजते. निधी असूनही ठेकेदाराने काम थांबविल्याने संकुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे कित्येकदिवसांपासून नाट्यसंकुलाचे नगरकरांचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. स्टेज, टॉयलेट व आसन व्यवस्थेचे स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. छताच्या ट्रेसेस ठेवण्याकरिताचे कॉलम तयार असून, ट्रेसेस लावण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
असे असेल नाट्यसंकुल
प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर (पहिला मजला) संपूर्ण वातानुकूलित (आसन क्षमता ः 1000) तळमजल्यामध्ये 10 बाय 20 मीटर आकर्षक वुडन फ्लोअरिंग, स्टेज, प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रूम, आकर्षक आसन व्यवस्था, अॅकोस्टिक इंटेरिअर, कॅफेटेरिया. पार्किंग – 1058 चौरसमीटर, तळमजला 3025.13 चौरसमीटर, पहिला मजला 1850.46 चौरसमीटर.
साहित्याचे दर वाढल्याने ठेकेदाराने काम थांबविले होते. मात्र, त्यावर तोडगा काढला असून, लवकरच नाट्यसंकुलाचे काम सुरू होईल.
– डॉ. पंकज जावळे, आयुक्त, महापालिका