

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भोसे ते जावली वस्ती रस्त्याबाबत तहसीलदारांनी दिलेला निकाल प्रांताधिकार्यांनी रद्द केला आहे. या रस्त्याची तहसीलदारांनी चौकशी करून दोन महिन्यांत आदेश द्यावा, असा निकाल दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असलेल्या शेतकर्याला न्याय मिळाला आहे.
भोसे येथील शेतकरी नाना शरद भगत यांच्या शेतातील गट नंबर 184 मध्ये कोणताही रस्ता नकाशावर नाही. असे असताना काही स्थानिक नागरिक व राजकीय नेत्यांनी पंचायत समिती अधिकार्यांसमवेत संगनमत करून नाना भगत यांच्या शेतामधून रात्रीतून रस्ता केला. यामध्ये त्यांच्या आंब्याच्या झाडांचे व मातीचे मोठे नुकसान केले. एवढेच नाहीतर भगत यांच्यावर रस्ता नष्ट केल्याप्रकरणी बनाव रचला. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचा रस्ता वेगळ्याच बाजूने असताना व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम केलेले नसताना, तो गैरप्रकार झाकण्यासाठी आपल्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची तक्रार भगत यांनी केली होती.
या प्रकरणी त्यांनी कर्जत येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता. त्यांनी तहसीलदारांनी दिलेला आदेश रद्द केला. तसेच, याबाबत तहसीलदारांनी फेरचौकशी करून दोन महिन्यांत निर्णय द्यावा, असे आदेश दिले आहेत.