नगर तालुका : 108 रुग्णवाहिकांचे पुणे कॉल सुरूच ! | पुढारी

नगर तालुका : 108 रुग्णवाहिकांचे पुणे कॉल सुरूच !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी मोफत असणार्‍या 108 रुग्णवाहिकांना महामार्गावरील अपघात, तसेच परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मात्र, या रुग्णवाहिका वारंवार पुणे येथे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी पाठविण्यात येत असल्याने नागरिकांचा विरोध वाढतच आहे. याबाबत जेऊर येथील ग्रामस्थांनी रुग्णवाहिका पुणे येथे पाठविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यात जेऊर, भिंगार, रूईछत्तीसी, चिचोंडी पाटील, केडगाव, जिल्हा सरकारी रुग्णालय या ठिकाणी 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

सदर रुग्णवाहिका देताना छत्रपती संभाजीनगर महामार्ग, नगर सोलापूर महामार्ग, जामखेड, पाथर्डी, पुणे महामार्गावरील झालेल्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी हा उद्देश होता. परंतु, सदर रुग्णवाहिकांना जिल्हा सरकारी रुग्णालयातून वारंवार पुणे येथे रुग्ण सोडविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रुग्णवाहिका ज्या गावांसाठी दिलेल्या आहेत, त्या परिसरातील रुग्णांसाठीच त्यांचा वापर व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आलेली आहे.
तालुक्यातील रुग्णवाहिकांना नेहमीच जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण पुणे येथे पाठविण्यासाठी कॉल दिले जातात. .

पर्यायाने रुग्णवाहिका पुणे येथे गेल्याने त्या परिसरात अपघात झाल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपघातग्रस्त जखमींचे प्राण गेल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. 108 रुग्णवाहिका पुणे येथे पाठविण्यास चिचोंडी पाटील, जेऊर तसेच तालुक्यातील नागरिकांनी कायम विरोध केला होता. जेऊर येथील ग्रामसभेत रुग्णवाहिका पुणे येथे पाठविण्यात येऊ नये, याबाबत ठराव देखील घेण्यात आलेला आहे. परंतु, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

जेऊर येथील रुग्णवाहिका रविवारी (दि.2), तसेच मंगळवारी (दि.4) जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुणे येथे कॉलवर गेल्याची माहिती समजताच माजी उपसरपंच बंडू पवार, उपसरपंच श्रीतेश पवार, महेंद्र तोडमल, शुभम गायकवाड, नीलेश इंगळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे तालुक्यातील रुग्णवाहिका पुणे येथील कॉलवर पाठविण्यात आल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

Back to top button