नगर ‘महसूल’कडून 132 टक्के वसुली ; पारनेर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत मोठी वाढ | पुढारी

नगर ‘महसूल’कडून 132 टक्के वसुली ; पारनेर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत मोठी वाढ

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुका महसूल प्रशासनाने यावर्षी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे असलेले 6.68 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करत, एकूण 12.88 कोटींची वसुली केली आहे. यामुळे वसुलीची टक्केवारी 132 वर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वसुलीच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. महसूल प्रशासनाने शेतसारा, शेजतमीन एन.ए. करताना भरावे लागणारे पैसे, वतन, सरंजामनिहाय भरून घेतलेली नजराणा रक्कम आणि इतर गौण खनिजांचे कर संकलित करताना तालुक्यात काटेकोर नियोजन केले. त्यामुळे वसुलीत वाढ झाली आहे. मागील वर्षी जमीन महसुलात 2.79 कोटी वसुली झाली होती. ती यावर्षी वाढून 3.14 कोटी झाली आहे. तसेच, गौण खानिज वसुली मागील वर्षी 5.98 कोटी होती. ती यावर्षी 9.76 कोटी इतकी झाली आहे. जमीन महसूल उद्दिष्ट 3.08 कोटी व गौण खनिज उद्दिष्ट 6.68 कोटी होते.

मागील वर्षी एकूण वसुली 8.77 कोटी होती. ती उद्दिष्टांच्या 67 टक्के होती. या वर्षी एकूण वसुली 12.85 कोटी असून, ती उद्दिष्टाच्या 132 टक्के आहे. केवळ टक्केवारीत वाढ नसून, प्रत्यक्ष वसुलीतही भरीव वाढ झाली आहे. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांचे नियोजन, त्यांना महसूलच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी दिलेली साथ, यामुळे या वर्षी सक्तीच्या वसुलीपेक्षा स्वेच्छा भरणा जास्त होता. त्यासाठी महसूल प्रशासनाने जनतेमध्ये जागृती केली.

तालुक्यात महा मायनिंगवर सर्व खाण चालक वाहने नोंदवतील, याची दक्षता घेण्यात आली. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट पासेसची सर्वाधिक तपासणी करण्यात आली. रात्रीच्या गस्तीमुळे 39 वाहनांवर झालेली दंडात्मक कारवाई व 3 वाहनांवर केलेले गुन्हे, यामुळे चोरीस आळा बसला. जमीन महसूल वसुली 2 एप्रिल 22 पासून सुरू केल्याने देखील वसुली सहज आणि सुकर झाली. न भरणार्‍यांवरील कारवाईत सातत्य ठेवले. औद्योगिक वसाहत मधून वसुली वाढली त्यासाठी त्या ठिकाणी तलाठ्यांचे म्हसणे फाटा व बाबुर्डी फाटा येथे स्थिर पथकामध्ये केलेले कर्तव्य देखील महत्त्वाचे राहिले. महिला तलाठ्यांनी घरची जबाबदारी सांभाळून सुट्टीच्या दिवशी कर्तव्याला महत्त्व दिले. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.

समुपदेशनामुळे सहज वसुली
दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ न देण्यासाठी खाण चालकांचे, तसेच सुपा एमआयडीसीतील कंपनी मालकांचे पावती घेतल्याशिवाय गौण खनिज घेऊ नये, असे केलेले समुपदेशन, प्रसंगी केलेली कायदेशीर कारवाई, यामुळे गौण खनिज वसुली सहज झाल्याचे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.

Back to top button