शाळेतील मुलांना देणार मोफत चष्मे ! | पुढारी

शाळेतील मुलांना देणार मोफत चष्मे !

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते 12 वी पर्यंतच्या मुलांची नेत्रतपासणी करून आवश्यकता असल्यास त्यांना मोफत चष्मे पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 4500 पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालयातील मुलांचीही लवकरच नेत्रतपासणी केली जाणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील वयवर्षे 6 ते 18 वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्या मुलांची नेत्रतपासणी करून दृष्टीदोषाचे वेळीच निदान करून वेळीच त्यांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही बाधा येणार नाही.

या दृष्टीने राज्यातील तब्बल 81556 शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित केल्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.ही योजना राबविण्यासाठी शासनाने 2022-23 या आर्थिक वर्षात 500 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयानुसार, जिल्ह्यातील 4500 पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी होणार आहे. त्यातील आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिली जाणार आहेत. लवकरच शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, समाजकल्याण, बालकल्याण इत्यादी लेखाशिर्षातून ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, माता बालसंगोपनचे डॉ. सोनवणे यांच्याकडून नियोजन केले जाणार असल्याचेही समजते.

Back to top button