

नगर : पुढारी वृत्तसेवा : नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे वाढविण्यात यावा, या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तहसीलदार संपावर गेल्यामुळे सर्वच तहसील कार्यालयाचे कामकाज साहेबांविना ठप्प होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील विविध मागण्यांचे निवेदन दिले. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचा ग्रेड पे 4 हजार 800 रुपये करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.
याबाबत के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतनत्रुटी समितीने देखील दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने विविध आंदोलने केली. आंदोलनाचा शेवटचा टप्पा जिल्हाभरातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारी कामबंद आंदोलन सुरु केले. मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.
प्रत्येक तहसील कचेरीत साहेब संपावर तर कर्मचारी कामावर असे चित्र निर्माण झाले.
कामबंद आंदोलनात तहसीलदार किशोर कदम, माधुरी आंधळे, डॉ. चंद्रशेखर शितोळे, रोहिदास वारुळे, अभिजीत बारवकर, अजभजित सुनीता जर्हाड, विशाल नाईकवाडे, वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, अभिजीत वांढेकर, योगेश कुलकर्णी, प्रशांत गोसावी, शंकर रोडे, राजू दिवाण, कैलास साळुंके, दत्तात्रय भावले, श्रीमती वरदा सोमण, किरण देवतरसे उपस्थित होते.