कर्जत : जखमी रुग्णास एक लाखाची मदत; आ. राम शिंदे यांनी घेतली रुग्णाची भेट | पुढारी

कर्जत : जखमी रुग्णास एक लाखाची मदत; आ. राम शिंदे यांनी घेतली रुग्णाची भेट

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : अपघातात पायाला मार लागून गंभीर जखमी झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रुग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

चैतन्य बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न चैतन्यच्या आई-वडिलांसमोर होता.

याबाबत माजी सरपंच दादासाहेब बिटके यांनी माहिती दिल्यानंतर आमदार शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. चैतन्य यास रुग्णालयात दाखल करण्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत ते जातीने लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यास आर्थिक मदत होण्यासाठी आमदार शिंदे यांनी आपल्या कार्यालयाला पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चैतन्य यास एक लाखाची मदत तातडीने प्राप्त झाली. आमदार शिंदे यांनी घरी जाऊन चैतन्यची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. कोणतीही मदत लागल्यास काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा त्यांनी बिटके कुटुंबियांना दिला. यावेळी दादासाहेब बिटके, गोविंद तांदळे, बाबासाहेब बिटके, गणेश बिटके आदी उपस्थित होते.

Back to top button