आवाज झाला अन् पोलिस वाचले..! पाथर्डीत दरोडेखोरांचा थरारक पाठलाग | पुढारी

आवाज झाला अन् पोलिस वाचले..! पाथर्डीत दरोडेखोरांचा थरारक पाठलाग

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : दरोडेखोर गुन्हा करून तुमच्या हद्दीतून जात असल्याचा अलर्ट पाथर्डी पोलिसांना मिळाला..या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर गाडी आडवी लावली..मात्र, दरोडेखोरांनी कोणताही विचार न करता पोलिसांच्या गाडीला जोराची धडक दिली..धडकेने पोलिसांची गाडी फिरली..मात्र सुदैवाने पोलिस वाचले.. धडकेचा झालेला आवाज ऐकून दरोडेखोरांना वाटले की पोलिसांनी गोळीबार केला..त्या भीतीने दरोडेखोरांनी गाडी पाथर्डीच्या दिशेने सुसाट वेगाने पळविली..मात्र पाठलाग करून पोलिसांनी तीनपैकी एका दरोडेखोरास पकडले..शुक्रवारी रात्री तब्बल दीड तास हे थरारक पाठलाग नाट्य रंगले होते..काचेचा आवाज झाला नसता तर, कदाचित आरोपींनी त्यांच्याजवळील गावठी कट्ट्यांतून पोलिसांवर गोळीबारही केला असता. एक पोलिस सोडता कोणाकडेही हत्यारे नव्हती.

पुणे जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकाला लुटणारे सराईत दरोडेखोर पाथर्डी हद्दीतून जात असल्याचा संदेश शुक्रवारी रात्री पोलिस दलाकडून पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दूरध्वनीद्वारे मिळाला. त्यानंतर मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या एका पथकाने माणिकदौंडी-पाथर्डी रस्त्यावर रांजणी फाट्यावर सापळा लावला. पोलिस निरीक्षक मुटकुळे हे दुसरे पथक व खासगी गाडीसह केळवंडी थांबले. काही वेळाने आरोपींची गाडी केळवंडी शिवारात आली. मुटकुळे यांनी तात्काळ पुढे सापळा लावून थांबलेल्या पथकाला संदेश दिला. रांजणी फाट्यावर असलेल्या पथकाने आरोपींची गाडी दिसताच, सरकारी पोलिस गाडी रस्त्यावर आडवी लावली. मात्र, कोणताही विचार न करता आरोपींच्या गाडीने जोराची धडक दिल्याने पोलिसांची गाडी फिरली. मात्र, पोलिस सुदैवाने बचावले. धडकेमुळे आरोपींच्या गाडीची काच फुटल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आरोपींना वाटले की पोलिसांनी आपल्यावर गोळीबार केला. त्या भीतीने आरोपी पाथर्डीच्या दिशेने अजून सुसाट वेगाने गाडी पळवू लागले.

या सर्व प्रकारानंतरही पोलिसांनी आरोपींचा तेवढ्याच वेगाने पाठलाग सुरू केला. पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर एक पथक सरकारी गाडीसह आरोपींना रोखण्यासाठी उभे होते. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी तेथून पोलिसांना हुलकावणी देत पुढे निघून गेले. त्यानंतर सरकारी पोलिस गाडीतून चालक किशोर पालवे यांनी आरोपींचा पाठलाग सुरूच ठेवला.

निवडुंगे शिवारात गाडी सोडून तिघे आरोपी पळाले. यातील प्रदीप भैय्यालाल भिसेन (रा.गोंदिया) हा निवडुंगे शिवारात गवताच्या शेतात लपून बसला होता. ग्रामस्थ व पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या हातात गावठी कट्टा असल्याचे पाहताच पोलिसांनी झडप टाकून त्याला पकडले. तर दोन आरोपी पळून गेले. आरोपींची गाडी तपासली असता त्यामध्ये गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह काही मुद्देमाल सापडल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री अकरा वाजता सुरू झालेली मोहीम साडेबारा वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर पहाटेपर्यंत पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू होता.

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ, हेड कॉन्स्टेबल रामनाथ भाबड, आकाश चव्हाण, अनिल बडे, संदीप कानडे, सचिन नवगिरे, राहुल तिकोने, चालक किशोर पालवे, अरुण शेकडे, कृष्णा बडे, भारत अंगरखे, विकी पाथरे, मुरलीधर लिपणे हे या धाडसी कारवाईत सहभागी झाले होते.

सुपे येथे गोळीबार करीत लूट
पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सुपे येथे या दरोडेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करत सराफ व्यावसायिकाला लुटले. या गोळीबारात दोघे जखमी झाले. येथे एका आरोपी ग्रामस्थांनी पकडला, तर तीन आरोपी वाहनातून पाथर्डीकडे पळाले. यातील एक आरोपी पाथर्डी पोलिसांनी पकडला. आरोपींकडील गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, लुटलेला मुद्देमाल पाथर्डी पोलिसांनी हस्तगत केला आहे.फ

पोलिसांकडून सिनेस्टाईल पाठलाग
केळवंडी शिवारापासून पोलिस चालक किशोर पालवे यांनी धाडसाने गाडी चालवित सुमारे चौदा किलोमीटर आरोपींच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग केला. त्यांच्या मागे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची खासगी गाडी व त्यामागे अन्य पोलिस कर्मचारी मोटर सायकलवरून पाठलाग करत होते. अखेर निवडुंगे शिवारात पोलिसांनी गाडी आडवी घालून आरोपींना थांबण्यास भाग पाडले.

Back to top button