नगर : ताजनापूर लिफ्ट प्रश्नावर रास्ता रोको ; उप अभियंत्यांचे आश्वासन | पुढारी

नगर : ताजनापूर लिफ्ट प्रश्नावर रास्ता रोको ; उप अभियंत्यांचे आश्वासन

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : ताजनापूर लिफ्टचा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करून लाभ क्षेत्रातील पाझर तलाव आणि विहिरी भरून द्याव्यात, या प्रमुख मागणीसह इतर प्रश्नांवर चापडगाव येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक महिन्यात सर्व तलाव आणि बंधारे भरून देण्याचे आश्वासन उपअभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन हे आंदेलन केले. यावेळी क्षितीज घुले म्हणाले, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आठ वर्षांत ताजनापूर लिफ्टचे घोंगडे भिजत ठेवले आहे.

पण, आता आपण एकत्रित झालो आहोत आणि आपल्याला आपले हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तालुक्यातील होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा देखील त्यांनी अधिकारी आणि जनतेसमोर पंचनामा केला. यावेळी एकनाथ कसाळ, संतोष पावसे, सचिन घोरतळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, युवक अध्यक्ष नंदकुमार मुंढे, राम आंधारे, संजय कोळगे, भारत लोहकरे, हनुमान पातकळ, शफीक सय्यद, बाळासाहेब विघ्ने, संभाजीराव तिडके आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हक्काचे पाणी मिळविणार : घुले
छत्रपती संभाजीनगर, गेवराई तालुक्यात आमच्या तालुक्यातून मोठमोठ्या पाईपलाईनने पाणी जाते. मात्र, आमच्या तालुक्यातील लोकांना उपेक्षित ठेवले जाते. किती दिवस आपण गप्प बसणार, आता सर्वांनी एकत्रित लढा देऊन आपले हक्काचे पाणी मिळवायचे आहे, असे घुले म्हणाले.

Back to top button