

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकार 2024 पर्यंत काम करणार आहे. त्यानंतर निवडणुका होऊन पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल. सरकार पडणार असल्याची विरोधकांची भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही, असा विश्वास रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. मंत्री भुमरे पाथर्डी तालुक्याच्या दौर्यावर आले असताना त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी संजय राऊत व विरोधकांवर टीका केली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णूपंत ढाकणे, शहरप्रमुख सागर गायकवाड, जिल्हा उपप्रमुख अंकुश चितळे, संदीप पालवे, आकाश वारे, पोपट पालवे, राजू गिरी, भागवत चेमटे, राहुल खेडकर आदी उपस्थित होते.
भुमरे म्हणाले, पवित्र रमजान व रामनवमी उत्सव एकाच महिन्यात आला. हा उत्सव सर्वांनी शांतता साजरा केला. संभाजीनगरच्या घटनेत राजकारण करणे चुकीचा आहे. विरोधकांना या घटनेत राजकारण करायचे आहे. प्रत्येक वेळी त्यांना राजकारण दिसते, असा टोला भुमरे यांनी राऊत यांना लगावला.
तेच त्यांना पाडणार
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना पाडण्यासाठी षड्यंत्र रचल्याच्या प्रश्नावर भुमरे म्हणाले, त्यावर मी नाही बोलणार, पण तेच त्यांना पाडणार आहेत. हे एक ना एक दिवस होणार आहे.