नगर : श्रीगोंदेतील दूध भेसळप्रकरणी तपास थंडावला | पुढारी

नगर : श्रीगोंदेतील दूध भेसळप्रकरणी तपास थंडावला

श्रीगोंदा : भेसळयुक्त दूध तयार करून त्याची विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात महत्त्वाचे चौदा आरोपी अद्याप पसार आहेत. हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलिसांचाही तपास थंडावल्याने या प्रकरणात नेमका कुणाचा दबाव आहे का? या नजरेनेही या प्रकरणाकडे पाहिले जाऊ लागले आहे. काष्टी येथील बाळासाहेब पाचपुते याच्या गोठ्यावर छापा टाकून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लागणारी व्हे परमीट पावडर व लाईट लिक्विड पॅराफीनचा साठा जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात चोवीस आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी दहा आरोपींना अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले. त्यातील संदीप मखरे आणि कैलास लाळगे यांनी पावडर आणि केमिकल कोणाकोणाला वितरित केले जात होते, त्यांची नावे पोलिसांना दिली. पोलिसांनी खातरजमा करून त्यांना या प्रकरणात आरोपी केले.

सुरुवातीच्या काही दिवसात माध्यमांचा दबाव असल्याने पोलिस तपास गतिमान राहिला. मात्र, गेल्या आठवडा भरापासून पोलिस तपासात विशेष प्रगती दिसत नाही. अर्थात आतापर्यंत एकच साखळी उघड झाली असताना, पोलिस तपास थंडावणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांची शोध मोहीम सुरू आहे. काही महत्त्वाचे आरोपी अद्याप पसार असल्याने यातील मुख्य वास्तव समोर येण्यास अडचणी येत असल्या तरी, या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत, असे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.

लाळगेने कागदपत्रेही जाळली
भेसळयुक्त दूध प्रकरणात महत्त्वाचा आरोपी असलेल्या कैलास लाळगे याने गुन्ह्यात नाव निष्पन्न होताच, स्वतःचा मोबाईल कालव्यात फेकून दिला. तर, हिशेबाची कागदपत्रे जाळून टाकली. पोलिस पथकाने या दोन्ही ठिकाणचा पंचनामा केला आहे.

बागेत पावडर, केमिकल नष्ट
आरोपी संदीप मखरे याने भेसळयुक्त दूध, ते तयार करण्यासाठी लागणारे केमिकल आणि पावडर एका लिंबोनीच्या बागेत नष्ट केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्या ठिकाणचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

चारचाकी वाहनातून पुरवठा
कैलास लाळगे हा केमिकल अन् पावडर चारचाकी वाहनातून श्रीगोंद्यात पोहच करत होता. सगळी शक्यता गृहीत धरून अतिशय शिस्तबद्ध पुरवठा बिनदिक्कत सुरू होता.

कारवाया का नाहीत?
अन्न व औषध प्रशासनाने काष्टी येथे छापा टाकून कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भेसळीचा गोरखधंदा अनेक दिवसापासून सुरू आहे. ही बाब अन्न व औषध प्रशासनास कशी समजली नाही की जाणीवपूर्वक कानाडोळा केला, हाही संशोधनाचा विषय आहे.

Back to top button