

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी राज्य सरकारने 50 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री. क्षेत्र चोंडी येथे 31 मे रोजी होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेली निधीची मागणी सरकारने मान्य केली आहे.
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रामदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. नियोजन विभागाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
नियोजन विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले की, पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 अंतर्गतच्या 'इतर जिल्हा योजनेतून' एक वेळची विशेष बाब म्हणून 50 लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
यंदा 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा जयंती सोहळा या निधीतून साजरा केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील धनगर समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी (ता. जामखेड) या जन्मगावी होत असलेल्या जयंती सोहळ्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने 50 लाख रूपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे आभार.
– आमदार प्रा.राम शिंदे