

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी ( ता. जामखेड) येथे त्यांच्या जयंतीसाठी 25 लाखांंएवजी 50 लाखांची तरतूद करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी जिल्हा जिल्हा वार्षिक नियोजनच्या बैठकीत केली.
जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झाली. गेल्या वर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी 25 लाख निधी देण्याची घोषणा केली होती. 25 लाखांऐवजी 50 लाखांची तरतूद करावी, अशी विनंती आमदार पवार यांनी बैठकीत केली.
दरम्यान, वीज रोहित्रांची मागणी नगर जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात असून, एकट्या कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये 22 कोटींची मागणी आहे. परंतु केवळ 7 ते 10 कोटी रुपये यासाठी प्रस्तावित केले आहेत. कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथे जैवविविधता उद्यान उभारणीसाठी पहिल्या टप्प्यातील 1.09 कोटी निधी मंजूर असताना केवळ 54 लाख निधी वितरित झाला, त्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. पहिल्या टप्प्यातील संपूर्ण रक्कम वितरित करून उर्वरित कामासाठी निधी मंजूर व्हावा, अशी विनंती पवार केली.
अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईसाठी 800 कोटींचा निधी नगर जिल्ह्याचा प्रलंबित आहे.
यातील 50 ते 60 कोटी रुपये कर्जत-जामखेड मतदारसंघातील असल्याने तो लवकरात लवकर वितरित करावा. अनेक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. नवीन खोल्यांसाठी निधी वाढवून द्यावा, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 150 ते 200 किलोमीटरचा आराखडा बनवला आहे, तो जशास तसा स्वीकारून मंजूर करावा, अशीही मागणी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी केली.