

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तरुणांना व्यायामशाळा उपलब्ध व्हावी, या हेतूने क्रीडा विभागातून 5 कोटी 36 लाखांच्या खर्चातून 117 ठिकाणी व्यायामशाळा साहित्य पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, साहित्याचा दर्जा चांगला नसल्याने अनेक ठिकाणच्या सरपंचांनी पुरवठा पत्रावरच स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ही खरेदी वादात सापडण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून व्यायाम शाळा साहित्य पुरवठा केला जातो. हा निधी क्रीडा विभागाला मिळतो, मात्र ही निविदा प्रक्रिया 'पुणे'तून राबविली जाते, असेही सांगितले जाते. नगरसाठीही उत्तरेतील दोन एजन्सींना बंदिस्त आणि खुल्या व्यायामशाळेचे साहित्य पुरवठ्याचे काम मिळाले आहे.
जिल्ह्यात खुल्या जागांवर 61 व्यायामशाळा साहित्य दिले जात आहे. त्यासाठी एकूण 3 कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. एका किटसाठी पाच लाखांची तरतूद केलेली आहे. या पाच लाखांत सहा साहित्य पुरविले जात आहे.
बंदिस्त व्यायामशाळा कुठंय?
बंदिस्त जागांवर 56 व्यायामशाळांचे साहित्य दिले जात आहे. त्यासाठी 2 कोटी 35 लाखांचा निधी पुरवठादार एजन्सीला देण्यात आला आहे. यातही 6 पेक्षा अधिक वस्तू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पाच लाखांत कोणते साहित्य?
पाच लाखांच्या खर्चातून सहा साहित्य दिले जातात. यात एअर वॉकर, चेस्ट प्रेस डंबेल, लेग प्रेस डंबेल, शोल्डर बिल्डर डंबेल, एक्सर सायकल आणि मल्टी फंक्शनल टे्रनर याचा समावेश आहे. आता या साहित्याचा दर्जाचा प्रश्न असताना त्याची खुल्या बाजारातील किंमत हा देखील कळीचा मुद्दा ठरत आहे.
बंदिस्तमध्येच तीनच साहित्यांचा पुरवठा?
बंदिस्त व्यायामशाळेसाठीही पाच लाखांचा खर्च केला जातो आहे. मात्र सध्या तरी यातून संबंधित ठेकेदार एजन्सी ही तीनच साहित्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात हॉर्स रायडर, क्रॉस टे्रेनर सिंगल, रॉवर हे तीनच साहित्य बसवून स्थानिक सरपंचांकडून दीड लाखांचे साहित्य मिळाल्याच्या पत्रावर स्वाक्षरी घेताना दिसत आहेत.
मागणी अगोदरच पुरवठा सुरू!
संबंधित पुरवठादार एजन्सी ही साहित्याच्या गाडीसोबतच चार प्रकारचे पत्र सोबत आणून त्यावर ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षर्या घेत आहेत. यात प्रमाणपत्र, पुरवठा चलन, काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचा दाखला आणि साहित्य मागणीचे पत्राचा समावेश आहे. एकीकडे मागणी करूनही वर्षानुवर्षे लाभ मिळत नाही, तर दुसरीकडे मागणी पत्राअगोदरच साहित्य दिले जाते. त्यामुळे साहित्य पुरवठ्याच्या या गोंधळाकडे ना जिल्हाधिकार्यांचे लक्ष आहे, ना जिल्हा क्रीडा अधिकार्यांचे.
चौकशी करा अन्यथा आंदोलन : पोटे
जिल्ह्यात पुरवठा केलेल्या जात असलेल्या सहा साहित्याच्या किटची बाहेर किंमत ही दोन लाखांच्या आसपास असताना इकडे मात्र पाच लाखांतून ती पुरविली जात असेल तर निश्चितच त्याचा दर्जा जिल्हाधिकार्यांनी तपासला पाहिजे, अन्यथा आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजित पोटे यांनी दिला आहे.